नागपूर शहरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा बंदमुळे नागरिकांसह आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड कडून जाहीर करण्यात आलेल्या 36 तासांच्या शटडाऊनमुळे शहरातील अनेक भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची माहिती अवघ्या एक दिवस आधी देण्यात आल्याने रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे.

आज म्हणजेच मंगळवार, 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून ते बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत नागपूरमधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असताना हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरमधील मेयो आणि मेडिकल रुग्णालयांवर या पाणीपुरवठा बंदचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील हजारो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयांमध्ये दाखल असतात. (Water) त्यामुळे ऑपरेशन थिएटर, वॉर्ड्स, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. याशिवाय या रुग्णालयांमध्ये एमबीबीएस, पीजी, नर्सिंग आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे हजारो विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. रुग्णालयातील लॉन्ड्री, पाकगृह आणि आहार केंद्रांनाही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने रुग्ण, नातेवाईक आणि विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मेयो रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची कमतरता भासू नये म्हणून 25 टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास आणखी टँकर्स मागवण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.दरम्यान, मेडिकल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडे स्वतंत्र पाईपलाईन देण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या (Water) अशा शटडाऊनमुळे आरोग्यसेवा प्रभावित होत असल्याने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशीनगर आणि मंगळवारी झोनसह अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. (Water) महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले असून ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा :
गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?
आता थेट ATM मधून काढा PF चे पैसे, UPI सुविधाही होणार सुरू