रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास बैठक झाले. यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अन्न धान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट या सारख्या करारांचा समावेश आहे. भारत आणि रशियादरम्यान कामगारांसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारांतर्गत आता भारतातील लोकांना कामासाठी रशियाला जाता येणार आहे, यामुळे काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये बैठक पार पडली, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत आणि रशियाच्या 23 व्या शिखर परिषदेमध्ये पुतिन यांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. पुतिन यांचा भारत दौरा अशावेळी होत आहे, ज्यावेळी रशिया आणि भारतामधील द्विपक्षीय संबंध एक-एक ऐतिहासिक माईलस्टोन पार करत आहेत. गेल्या आठ दशकांमध्ये जगभरात अनेक चढ उतार पहायला मिळाले, मानवतेला अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागाला आहे. मात्र हे सर्व होत असताना देखील भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ राहिली आहे. एकमेकांचा सन्मान आणि विश्वासावर ही मैत्री टिकलेली आहे, ही मैत्री काळाच्या कसोटीवर नेहमीच खरी ठरली आहे, असं यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, गुरुवारी पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालं. भारतामध्ये पुतिन यांचं भव्य स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल त्यांनी या पत्राकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. काल मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *