जगात सर्वांचा लाडका असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे ठाकले आहे. गुजरातने या आंब्यावर दावा करत ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
कोकण हापूसचे पहिले आणि एकमेव मानांकन
जगात ‘कोकण हापूस’ हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. हे मानांकन कोकणातील हापूस उत्पादकांना एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देते. कोकण हापूसला 2018 मध्ये भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले. यापूर्वी 2022 मध्ये, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने देखील ‘हापूस आंबा’ नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे.
गुजरातचा ‘वलसाड हापूस’वर दावा
गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन (Geographical Classification) मिळण्यासाठी अर्ज केला आहे. या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. या अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी पार पडली आहे.
कोकण आंबा उत्पादकांचा कडाडून विरोध
या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केला आहे. मुळात, कोकण हापूसमध्ये कर्नाटक, केरळ , तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील अन्य भागांमध्ये उत्पादित होणाऱ्या आंब्याची भेसळ केली जाते. भेसळ रोखण्यासाठी ‘क्यूआर कोड’ तयार करूनही भेसळ होत आहे.