कबुतरखान्यांवरुन मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबुतरखान्यांच्या मुद्यावरुन ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना मतांसाठी मारहाणही करेल असा हल्लाबोल निलेशचंद्र मुनी यांनी केला आहे. चिकनसाठी शिवसेना गेली आता राज ठाकरे तुम्हीही झिरो व्हाल असा इशारा त्यांनी दिला आहे. तर मराठीचा सन्मान असेल तर भेंडीबाजारात जा असं आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे.
“कबुतरावरुन समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण एवढं ढवळून निघेल असं कोणी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास बसला नसता. पण निवडणुकीचा हंगाम असला की अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो,” असं सांगत शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाचे मुनी पुन्हा सक्रिय झाले आहेत.
“प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन प्राणयांसाठी जनजागृती करणार. आप बटोंगे तो पिटोगे, भाषेवरून मारहाण किती योग्य? आम्ही जैन सनातनी आहोत, प्रत्येक वॉर्डात कबुतर रक्षक तयार करणार,” असं जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं आहे.
“तुमच्यापेक्षा महाराष्ट्राचा जास्त सन्मान हा राजस्थानी समाज करतो. तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे, छत्रपतींचं स्वराज्य वाचवायचं असेल तर मग भेंडी बाजारात जा, मुंब्र्यात जा. तुम्ही तिथं का बरं जात नाही?,” असं जाहीर आव्हानच त्यांनी दिलं आहे. मी कट्टर सनातनी आहे, मला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे असंही ते म्हणाले आहेत. कबुतरांमुळे कोणतेही आजार होत नाहीत असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.
“आजपासून मी प्रत्येक टॉवरमध्ये जाणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत तसे कबूतर रक्षक तयार करत आहोत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते कबुतर घेऊन येत असतात,” असं ते म्हणाले.
“जर आज तुमच्या इमारतीत काही समस्या आली, तर चिकनच्या नादात एकजणही मदतीला येणार नाही. परळ, लालबागध्ये उद्धव ठाकरेंचं राज्य आहे. कोणत्याही नेत्याला फोन करा की माझ्या इमारतीत समस्या आहे, येणार नाही. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा. तुम्ही आता मार खात आहात. हे तुम्हाला परत मारतील. मोदींनी सांगितलं होतं की, बटेंगे तो कटेंगे तर मी जैनांना सांगत आहे की, बटेंगे तो तुम पिटोगे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“सर्वात पहिले आपली वोट बँक मजबूत करा. आज आपल्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम, बांग्लादेशींसोबतचा वाद दुसरीकडेच राहिला आहे. पण आता मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरु झाला आहे,” अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. जसं चिकनच्या नादाला लागून शिवसेना गेली, तसं तुम्ही पण झिरो व्हाल असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.