नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांकडून आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल येणं अद्याप बाकी असताना, सर्व पक्षांनी पुढील निवडणुकांसाठी राजकीय गणितं मांडायला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने जागावाटप, मतदारसंघ यासंदर्भात चर्चाही सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंनीही आता पालिका निवडणुकीकडे लक्ष वळवलं असून भाजपाकडे 125 जागांसाठी प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंची महापालिकेत 125 जागेसाठी आग्रही आहे. लवकरच शिवसेना भाजपासमोर 125 जागेचा प्रस्ताव ठेवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
तीन नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील तीन आमदाांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. पश्चिम उपनगरात पालिकेच्या या जागांवर मुंबईचा महापौर बसतो. त्यामुळेच शिंदेंनी पश्चिम उपनगरातल्या या तीन आमदारांवर पश्चिम उपनगराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ते तीन आमदार कोण?
यात मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीतील आमदार मुरजीकाका पटेल आणि कुर्ल्यातील आमदार दिलीप मामा लांडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे. या तिघांवर 12 ते 15 जागांची जबाबदारी सोपवण्यात आली असून याच प्रकारे मुंबईतही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदारांची बैठक घेणार
शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. बैठकीत हिवाळी अधिवेशनच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चा केली जाणार आहे. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वच दिवस सर्वच मंत्रांनी उपस्थित राहण्यासंदर्भात शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चेची शक्यता आहे.