अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील ” सिंहासन”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची अनेक वर्षे रखडलेली पंचवार्षिक निवडणूक सध्या लागली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली आहे. पण “सिंहासन”या मराठी चित्रपटाची याद यावी, अशी ही निवडणूक गाजू लागली असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या सुद्धा या निवडणुकीत उतरल्याने अप्रत्यक्षपणे या निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला आहे. दिनांक आठ जूनला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

पत्रकार अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित जब्बार पटेल दिग्दर्शित”सिंहासन”या नावाचा एक चित्रपट 45 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर खळबळ उडवून गेला होता.हा चित्रपट पूर्णपणे राजकारणावर विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर बेतलेला होता याशिवाय”सरकारनामा”या नावाचा राजकारणातील शह आणि काटशहाच्या घटनांवर आधारित आणखी एक मराठी सिनेमा पडदा गाजवून गेला होता. अगदी या दोन्ही चित्रपटांची हमखास आठवण यावी असे राजकारण सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये सुरू आहे. आणि आता पंधरा गटातील 17 जागांसाठी साठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यंदा प्रथमच या निवडणुकीला राजकीय झालर लागलेली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या निवडणूक लढवत आहेत. (Marathi Film) त्यांच्या विरोधात ज्येष्ठ अभिनेते वर्षा उसगावकर या उभ्या ठाकल्या आहेत. आणि उबाठा सेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत शासकीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नीलम शिर्के यांना निवडून आणण्यासाठी शासकीय यंत्रणा वापरली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महामंडळाचे मावळते अध्यक्ष मेघराज भोसले विरुद्ध विजय पाटकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. विजय पाटकर यांनी या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केले होते मात्र प्रत्यक्षात ते दाखलच केले गेले नाही. परिणामी ते निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहिले आहेत. नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू न देण्यामागे मेघराज भोसले यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तर मेघराज भोसले यांनी पाटकर हे भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे. विजय पाटकर यांनी स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले नाम निर्देशन पत्र दिलेले दिसत नाही. कुणाच्यातरी मार्फत त्यांनी उमेदवारी अर्ज दिलेला दिसतो. आपला अर्ज दाखल का झाला नाही हे आपणाला समजत नाही अशी प्रतिक्रिया पाटकर यांनी दिली आहे.

इसवी सन 2021 मध्येच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. मात्र या ना‌ त्या कारणाने निवडणूक होऊ शकली नव्हती. आता मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. (Marathi Film) संगीतकार गटातून आनंद शिंदे आणि संकलन गटातून विजय खोचीकर हे दोघे बिनविरोध निवडून आलेले आहेत.वर्षा उसगावकर विरुद्ध उदय सामंत यांच्या पत्नी नीलम या उभ्या असल्याने निवडणुकीला राजकीय रंग येणे स्वाभाविक आहे आणि तसा तो आलाही आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज पर्यंत कायमच अतिशय चुरशीने झालेली आहे. या महामंडळावर अनेक मातब्बर मंडळींनी काम केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीला गत वैभव मिळवून देणे, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांचा सन्मान वाढवणे, काम उपलब्ध करून देणे, राज्य शासनाचे अनुदान मिळवून देणे अशी अनेक कामे महामंडळाच्या वतीने केली जातात. पण सध्या मराठी चित्रपट सृष्टीची अवस्था काय आहे? किती मराठी चित्रपट निर्माण होतात आणि त्यांना चित्रपट गृह प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी किती प्रयत्न केले जातात हे प्रश्न निवडणूक लागली की उपस्थित केले जातात.

मराठी चित्रपट सृष्टी समोर आज अनेक प्रश्न आहेत. पण ते अत्यंत प्रभावीपणे राज्य शासनासमोर मांडले जातात काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्रात काही राजकीय पक्षांनी मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट सृष्टी समोरील प्रश्नही ऐरणीवर आणले गेले पाहिजेत. पण त्याऐवजी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकारण आणले जाते आहे. राजकारणी मंडळींच्या बरोबरच इथेही आरोपांचा राजकीय चिखल केला जातो आहे. (Marathi Film) त्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ स्थापने मागचा हेतू फसला आहे की काय अशी शंका यावी असे वातावरण आहे. 15 गटातील 17 जागांसाठी 60 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि दिनांक सात जून रोजी कोल्हापूर पुणे आणि मुंबई या तीन शहरात मतदान प्रक्रिया होणार आहे आणि दिनांक आठ जून रोजी या महामंडळाची सूत्रे कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?

चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला