कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
इजराइल अमेरिका विरुद्ध इराण (week)यांच्यातील युद्धाला सुरुवात होऊन शनिवारी एक आठवडा होतो आहे. पश्चिम आशियामध्ये या युद्धाच्या झळा अधिक तीव्रतेने बसत असताना भारतातील प्रत्येक घरापर्यंत त्याचा दाह किंवा झळा पोहोचलेल्या आहेत. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आता 21 दिवसानंतर मिळणार आहे आणि त्याचबरोबर नवीन गॅस नोंदणी अनिश्चित काळापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे. याशिवाय इतरही प्रतिकूल परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दिसू लागले आहेत. इंधन टंचाईवर मात करण्यासाठी रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले जाणार आहे, पण येथेही डोनाल्ड ट्रम्प महाशयांचीमुजोरी पाहायला मिळत आहे. इरांणकडून हार्मूझ समुद्रमार्गे सर्व प्रकारची जहाज वाहतूक बंद केली आहे.

इथून 65 टक्के इंधन भारतात (week)आयात केले जात होते. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे भारताची मोठी अडचण झाली आहे. अशावेळी जुना मित्र म्हणून रशिया मदतीसाठी पुढे आलाआहे. भारताला हवे तितके कच्चे तेल देण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. त्यामुळे भारतात इंधन टंचाई होणार नाही. मात्र इथेही डोनाल्ड ट्रम्प यांनी खोडा घातला आहे. भारताने रशियाकडून कच्चे तेल घेण्यासाठी अमेरिकेने 30 दिवसांची सवलत दिली आहे.
30 दिवसानंतर रशियाकडून कच्चे (week) तेल घेता येणार नाही असा त्याचा अर्थ आहे आणि होतो.तीस दिवसांची सवलत म्हणजे आम्ही उपकार करत आहोत असे ट्रम्प यांना वाटणे म्हणजे भारताच्या व्यापार विषयक व्यवहारात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. अमेरिकेची ही मुजोरी भारताने खपवून घेता कामा नये. पूर्वीचा भारत राहिलेला नाही आणि आत्ताचा भारत बलवान आहे हे या ट्रम्प महाशयांना समजलेले नसेल तर तसे कोणीतरी त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.मध्य पूर्वेत सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतलेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा तो भाग आहे. याचा अर्थ भारताचा इजराइल व अमेरिकेला या युद्धात पाठिंबा आहे असे नाही.
मध्यपूर्वेत तेल संपन्न देश आहेत. (week) येथूनच भारताला कच्चे तेल आणि गॅस मिळतो. इराणने इराक, कुवेत, सौदी अरेबिया येथील तेल विहिरींना आगी लावल्या आहेत. त्यामुळे त्या देशांनी तेल उत्पादन आणि गॅस उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा तसेच वाहनांसाठी लागणारा गॅस तसेच पेट्रोल डिझेल याची आयात बंद आहे. परिणामी अनेक खाद्य वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेल, फळे, ड्राय फ्रुट्स यांच्या किमती वाढल्या आहेत. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ही महागला आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर मागणी केल्यानंतर घरपोच केला जात असे. आता मात्र गॅस मागणी नोंदणी केल्यानंतर 21 दिवसांनी स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मिळणार आहे.
गॅस सिलेंडरच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या सवलती सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नवीन गॅस सिलेंडर मागणी प्रलंबित ठेवली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील युद्ध आता घराघरापर्यंत अशा प्रकारे पोहोचलेले आहे. इंधन टंचाई नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शासनाकडून केले जात असले तरी पेट्रोल आणि डिझेल पंपावरील गर्दी कमी होताना दिसत नाही.
रमजानच्या महिन्यात आखाती देशातून भारतात मोठ्या प्रमाणावर ड्रायफ्रूट्सची आयात होत असते. आता रमजानचे रोजे सुरु असतानाच इजराइल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात गेल्या शनिवारी युद्धाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे भारतातील बाजारपेठेत ड्रायफ्रूट्सच्या किमती वाढलेल्या आहेत.
भारताचे अनेक देशांशी अनेक वर्षांपासूनचे व्यापारी व्यवहार आहेत. भारताकडून परदेशात जशी निर्यात केली जाते तसेच आयात सुद्धा केली जाते. त्या संबंधाचे व्यापार करार झालेले आहेत.
तो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. आणि या धोरणात अन्य देशांचा हस्तक्षेप अपेक्षित नाही. पण अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही देशाच्या व्यापार व्यवहारात हस्तक्षेप करण्याचे आपणाला जन्मसिद्ध अधिकार आहेत असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले पाहिजे. 30 दिवसानंतर रशियाकडून तुम्हाला तेल अर्थात कच्चे तेल विकत घेता येणार नाही असे सांगणे म्हणजे एक तर त्यांची मुजोरी आहे किंवा हस्तक्षेप आहे. त्यामुळेच भारताने त्यांना कठोर शब्दात सुनावले पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची लोकभावना आहे.