कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली नजीकच्या आग्रा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात बोलताना केली आहे. त्यांच्या घोषणेचे शिव प्रेमीकडून स्वागतच केले जाईल मात्र यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणांचे काय झाले? हा प्रश्न सुद्धा कुणीतरी उपस्थित केला तर त्याचेही उत्तर मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.

काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्रात सरकार असतानानवी दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोपविण्यात आली होती.महाराष्ट्र सदन बांधकाम पूर्ण झाले पण या बांधकामात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र सदन मुंबईत आणि दिल्लीत गाजले. याच महाराष्ट्र सदन परिसरात राजर्षी शाहू महाराज आणि संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण कृती पुतळे प्रतिष्ठापित करण्यात आले आहेत. त्याचा अनावरण सोहळा सुद्धा भव्य प्रमाणात करण्यात आला होता. तथापि या दोन्ही पुतळ्यात प्रथमदर्शनीच मोठे दोष आढळून आले होते. हे दोन्ही पुतळे हे त्या महान व्यक्तींचेच आहेत का अशी शंका यावी इतके सदोष शिल्पकाम झाले होते.
महाराष्ट्र सदन परिसरातील हे दोन्ही पुतळे बदलण्यात यावेत. पुन्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा दिसू नयेत म्हणून तज्ञांची समिती नियुक्त करावी. 2024 च्या विधिमंडळ अधिवेशनात या सदस्य पुतळ्यांच्या संदर्भात सरकारला विचारणा करण्यात आली होती. तेव्हा अजीतदादा पवार यांनी हे पुतळे बदलण्यात येतील अशी घोषणा केली होती. आता 2026 साल उजाडले तरी पुतळे काही बदलले गेले नाहीत. वास्तविक महाराष्ट्रातील खासदारांनी, विशेषतः कोल्हापूरचे खासदार आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी याबद्दल आवाज उठवणे आवश्यक होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून भव्य शिल्पकृती उभा केली जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेलाही एक दोन वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक वाड्याचे भव्य स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा महायुती सरकारनेच केली होती. प्रत्यक्षात या घोषणा दुर्दैवाने कागदावरच राहिलेल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथील औरंगजेबच्या नजर कैदेतून स्वतःसह शंभुराजांची सुटका करून घेतली होती. आग्र्याहून सुटकेचा हा थरार शिवचरित्रातील एक सोनेरी पान आहे. महाराष्ट्रातील हजारो पर्यटक दिल्लीला जातात.
आग्रा येथे जाऊन ताजमहाल पाहतात मात्र तिथून जवळच छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या वास्तुत नजर कैदेत ठेवले होते ती वास्तू पाहायला जात नाहीत ही शोकांतिका म्हणावी लागेल. आता आग्रा येथील त्या वास्तु परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडवणारे शिवशिल्प उभारले जाईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी चारच दिवसांपूर्वी विधिमंडळामध्ये बोलताना केली आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन परिसरातील राजर्षी शाहू महाराजांचा आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा सदोष शिल्पकाम असलेला असे दोन्ही पुतळे लवकरात लवकर बदलण्यात यावेत आणि ज्या दिवशी या कामाला सुरुवात होईल त्याच दिवशी आग्रा येथील शिवस्मारकाचे काम सुरू व्हावे.
करवीर संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचे पन्हाळा येथे निवासस्थान आहे. आजही चांगल्या स्थितीत ही वास्तू आहे मात्र ती छत्रपती ताराराणी यांचे निवासस्थान आहे असा फलकही तिथे लावला गेलेला नाही. अशा प्रकारचा फलक लावला गेला तर इतिहास प्रेमी या वास्तूचे दर्शन घेतल्याशिवाय, वास्तुपुढे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे यांची समाधी सुद्धा कर्नाटकात दुरावस्थेत आहे.सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचा उद्धार, तसेच त्यांच्या समाधी स्थळाचे काम असेच कितीतरी वर्षे रेंगाळले होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याच महिन्यात राजश्री शाहू समाधी स्थळ लोकार्पण केले आहे.