अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या आणि बहुजन व पीडित समाजासाठी झटणाऱ्या प्रविण गायकवाडांवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून(Congress ) करण्यात आला आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेधही करण्यात आला. अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे प्रविण गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयात तशा प्रकारच्या संस्थेची नोंदणी मुळात झाल्याने, या नावात बदल करू शकत नसल्याची तांत्रिक अडचण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे केवळ निमित्त साधून, भाजप युवा मोर्च्याचा पदाधिकारी व सहकाऱ्यांनी केलेला भ्याड हल्ला निषेधार्ध असून, ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था लयाला गेल्याचे’ स्पष्ट द्योतक आहे.

अहिल्यानगरचा छिंदम, कोरटकर, सोलापूरकर, माजी राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वेळोवेळी केलेला शिव छत्रपतींच्या अवमानावर व भाजप मातृ संस्थेच्या तत्कालीन नेत्यांनी श्री शंभूराजेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यावर भाजप युवा नेते गप्प का? असा संतप्त सवालही काँग्रेस(Congress ) राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला.

संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार, अक्षय शिंदे फेक एन्कांउटर यांसारखे विषय अद्याप कायदेशीर पूर्णत्वास येत नाही. राज्यात कोयता गँग, ठाणे पोलीस स्टेशनमधील गोळीबार, महिला अत्याचार व अक्कलकोटमधील आजच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारावजा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यातील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेविषयी व अस्मितेविषयी जराही चाड असेल तर ‘महायुतीच्या सत्तेतील’ दोन्ही पक्षांनी, फडणवीसांकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असे आवाहन गोपाळ तिवारी यांनी केले.

हेही वाचा :