सॅमसंगने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन (Samsung) गॅलेक्सी F70e 5G लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या नव्या गॅलेक्सी F70 सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असून, बजेट सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह तो ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसोबतच हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरूनही खरेदी करता येणार आहे.
कंपनीने या फोनमध्ये मीडियाटेकचा शक्तिशाली डायमेन्सिटी प्रोसेसर, मोठी 6000mAh बॅटरी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. विशेष म्हणजे, सॅमसंगने या स्मार्टफोनसाठी सहा वर्षांचे OS अपग्रेड आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे, जे या किंमत श्रेणीत मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.

भारतीय बाजारात (Samsung) सॅमसंग गॅलेक्सी F70e 5G हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन लाईमलाईट ग्रीन आणि स्पॉटलाइट ब्लू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
या किंमत श्रेणीत सॅमसंगचा हा 5G फोन मोटोरोला G57 पॉवर 5G, रेडमी नोट 14 SE 5G, पोको M7 प्लस 5G आणि iQOO Z10 Lite 5G यांसारख्या स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करणार आहे. ग्राहकांना हा फोन 17 फेब्रुवारीपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
फीचर्सबाबत सांगायचे झाल्यास, सॅमसंग (Samsung) गॅलेक्सी F70e 5G मध्ये 6.7-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा ड्युअल सिम स्मार्टफोन Android 16 आधारित One UI 8 वर कार्यरत आहे.
परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या फोनने AnTuTu बेंचमार्कमध्ये सुमारे 6.23 लाख गुण मिळवले आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय, दिवसभराचा वापर सहज पार पाडण्यासाठी फोनमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. एकूणच, दमदार बॅटरी, दीर्घकाळ मिळणारे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सॅमसंग ब्रँडचा विश्वास यामुळे गॅलेक्सी F70e 5G हा बजेट सेगमेंटमधील एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी