मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात रविवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश (Cloudburst)पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे सहा गावं जलमय झाली आहेत. रात्री दीड ते दोनच्या सुमारास आलेल्या पावसामुळे लेंडी नदीला मोठा पूर आला आणि गावकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. या गावांपैकी रावणगाव आणि हसनाळमध्ये तब्बल 89 नागरिक अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) तातडीने दाखल झाले आणि सकाळपासूनच बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झाला नसला तरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उद्गीर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी नदीचा पाणीप्रवाह वाढला. या अचानक आलेल्या पुरामुळे एका रात्रीत तब्बल 18 फूट पाणी वाढल्याचे स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी सांगितले.

अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली. या भागातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत.रात्रीच चार गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले(Cloudburst). मात्र, रावणगावात 80 जण तर हसनाळमध्ये 9 जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्यासह संपूर्ण प्रशासन यंत्रणा सकाळी सहा वाजल्यापासून कार्यरत होती.
सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी घटत आहे. तरीही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात झालेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा प्रकल्पातून आलेल्या पाण्यामुळे धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनसह दरवाज्यांतून एकूण 23,800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत आणि पुर्णा या प्रमुख शहरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. जवळपास 200 खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.यासोबतच जवळपास 70 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांना पाणीपुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा :
Advance Rent चा नियम बदलणार; होणार मोठा आर्थिक फायदा
डोनाल्ड ट्रम्प घाबरले? एक पाऊल टाकले मागे, अगोदर थेट धमक्या आणि आता…
सोन्याचे दर किंचित घसरले, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्य़ा सविस्तर