मराठी इंडस्ट्री हादरली! अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या छोट्याशा पण ठसठशीत भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या तुषार घाडीगावकर(Actor ) याने जीवन संपवल्याची दु:खद घटना समोर आली आहे. काही दिवसांपासून काम नसल्यामुळे तुषार मानसिक तणावात होता, आणि याच नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप परिसरात घडली असून, तुषारच्या निधनामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

तुषारने ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधून अभिनय(Actor ) करत प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली होती. त्याचप्रमाणे ‘भाऊबळी’, ‘झोंबिवली’, ‘उनाड’ या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं होतं. ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकात आणि ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत अलीकडेच त्याने काम केलं होतं.

तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात केली. महाविद्यालयीन रंगभूमीवर ‘घाड्या’ या टोपणनावाने परिचित असलेल्या तुषारने व्यावसायिक अभिनय क्षेत्रात अनेक लहान पण लक्षवेधी भूमिका केल्या. मात्र अलीकडे त्याला सातत्याने काम न मिळाल्यामुळे तो खचला होता. त्याच्या मृत्यूमुळे अभिनय क्षेत्रातील अस्थिरता, स्पर्धा आणि नैराश्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

तुषारच्या निधनावर अनेक सहकलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेता अंकुर वाढवे याने फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटलं, “काम येत जातं… पण आत्महत्या हा मार्ग नसतो!” त्याचप्रमाणे वैभव मांगले यांनीही भावनिक प्रतिक्रिया देत, “माणसं आतून तुटलेली असतात… अपेक्षा आणि वास्तव यांच्यातली दरी खूप मोठी होते,” अशी वेदनादायी टिप्पणी केली आहे. या घटनेतून स्पष्ट होते की, मनोरंजनसृष्टीत झगडणाऱ्या कलाकारांसाठी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज किती महत्त्वाची आहे. तुषारच्या आत्महत्येने या गोष्टीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

हेही वाचा :