कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : रविवारी दुबई येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय होल्टेज क्रिकेट(cricket) सामना होणार आहे आणि इकडे महाराष्ट्रात या क्रिकेट सामन्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. पहलगाम येथे भारतीय पर्यटक महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांशी पाकिस्तानचं असलेलं समर्थन उघड झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाबरोबर सामना रद्द करावा किंवा त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळूच नये अशी सार्वत्रिक लोकभावना आहे. पण दुबईत होणाऱ्या या सामन्याला केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने मंजुरी देऊन नेमकं काय साध्य केलंय हे करावयास मार्ग नाही.

पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. 26 महिला पर्यटकांच्या कपाळावरचं या दहशतवाद्यांनी कुंकू पुसलं. संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. आणि त्यानंतर भारताने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून पाकिस्तान मधील दहशतवादी तळावर हल्ले केले. त्याच्याही आधी सिंधू जल करार स्थगित करताना रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असा पाकिस्तानला सज्जड दम दिला. त्यानंतर चार दिवसांचे अघोषित युद्धही झाले. आजही भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातील संबंध कमालीच्या पातळीवर बिघडलेले आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर ठार मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीस पाकिस्तानच्या लष्करामधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पहेलगाम दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृत होता हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. या एकूण पार्श्वभूमीवर दुबई येथील स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पूर्वनियोजित क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा. पाकिस्तानशी क्रीडा संबंध तोडून टाकावेत. अशी लोकभावना आहे.
रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नसेल तर मग क्रिकेटही(cricket) खेळता कामा नये अशी सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अघोषित युद्ध सुरू होते तेव्हा आणि त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने भारत विरोधी भूमिका घेत आला आहे.
काश्मीर विषय जागतिक मंचावर मांडण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते हे भविष्यात कधीही भारताबरोबर सलोख्याचे संबंध राखण्याचा प्रयत्न करतील असे वाटत नाही. त्यामुळे दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे या दोन देशातील संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे ठरेल.
एकीकडे रक्त आणि पाणी एकत्रपणे होऊ शकत नाही असे सांगणाऱ्या केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने दुबईत होणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला सहभागी होण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे भारतीयात नाराजी आहे. यावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. उबाठा सेनेने या विषयावर भारतीय जनता पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे. रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी उबाठा सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने मुंबईत आमचे सिंदूर आमचा अभिमान हे आंदोलनात्मक अभियान हाती घेतले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह आणखीही काही राजकीय पक्षांनी भारत विरुद्ध पाक या क्रिकेट(cricket) सामन्यावरून केंद्रावर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब ठाकरे हयात असताना मातोश्री निवासस्थानी पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू जावेद मिया दाद याला खास निमंत्रित करून त्याला बिर्याणी खायला दिली होती. या घटनेची आठवण करून दिली आहे.
जावेद हा मातोश्रीवर बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. तो बाळासाहेब ठाकरे यांचा चाहता होता. आणि तेव्हा आजच्यासारखे पाकिस्तानशी भारताचे संबंध बिघडलेले नव्हते. ज्या बाळासाहेबांनी जावेद मिया दाद याला बिर्याणी खाऊ घातली त्याच बाळासाहेबांनी मुंबईत भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना होऊ दिला नव्हता. त्यांच्या आदेशावरून काही शिवसैनिकांनी स्टेडियम वरील धावपट्टी उखडून टाकली होती.
एकूणच दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाक क्रिकेट सामन्यामुळे भारतीय जनता पक्ष हा चांगलाच अडचणीत आला आहे. या सामन्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारणार आहेत यावर भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे काय? पहेलगाम दहशतकांड घडल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर, चार दिवसांच्या अघोषित युद्धात पाकिस्तानला नमवल्यानंतर पाकिस्तान विरोधी संतप्त भावना अजूनही असल्यानंतर अशा प्रकारचा क्रिकेटचा सामना होण्यासाठी केंद्राच्या क्रीडा मंत्रालयाने दिलेली परवानगी लोक भावनेचा अनादर करणारी आहे.
हेही वाचा :
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
हा परतीचा पाऊस की मुक्काम ठोकलेला? राज्यात पुन:श्च मुसळधार
सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरुच,जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती