महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने(Bank) मोठा आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे. पती-पत्नी या दोघांना एकाच बँकेत नोकरी करण्यास बंदी घालणारे नवे धोरण आता लागू करण्यात आले आहे. यामागे बँकेचा हेतू म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष, गोपनीयता भंग आणि गैरवर्तनाच्या शक्यता टाळणे हा आहे. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नवीन नियमांनुसार, जर बँकेत (Bank)कार्यरत दोन कर्मचाऱ्यांचा परस्परांशी विवाह झाला, तर त्यांनी ताबडतोब HR विभागाला याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच विवाहानंतर ६० दिवसांच्या आत पती-पत्नींपैकी एकाला नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. जर स्वेच्छेने निर्णय घेतला नाही, तर कोणाला सेवेत ठेवायचे याचा अधिकार बँकेकडे असेल.
भरती प्रक्रियेत बदल :
– राज्य सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
– जर उमेदवाराचा जोडीदार आधीच राज्य बँकेत काम करत असेल, तर त्या उमेदवाराला नोकरीसाठी अपात्र ठरवले जाईल.
– पुढील काळात भरतीच्या जाहिरातींमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे की पती-पत्नींपैकी फक्त एकालाच बँकेत नोकरी करता येईल.
घरभाडे भत्त्यावर नवी अट :
बँकेने आधीपासून नोकरीवर असलेल्या पती-पत्नींसाठीही नवे नियम ठरवले आहेत. याशिवाय घरभाडे भत्ता पती-पत्नींपैकी ज्या कर्मचाऱ्याचा जास्त असेल त्यालाच मिळेल. मात्र, जर दोघे वेगवेगळ्या शहरात राहतात याचे प्रमाणपत्र सादर केले, तर दोघांनाही HRA मिळू शकतो. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल यांना एकच शहर मानले जाणार आहे.

या निर्णयामुळे सहकारी बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. एका कुटुंबातील दोघेही नोकरी करत असल्यास त्यांच्या कारकिर्दीवर थेट परिणाम होणार आहे. आता पुढील काही दिवसांत कर्मचारी संघटनांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग
जीएसटी दरात आजपासून कपात; दिवाळी होणार गोड
शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेची उत्साहात सुरुवात