कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

गोकुळ दूध संघावर काही महिन्यापूर्वी महायुतीचे तोरण लावण्यात आले असले तरी सत्ता मात्र काँग्रेस आघाडीचीच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांनी संयुक्तपणे “डिबेंचर”विषयावरून संघाच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. आणि त्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाच्या शौमिका महाडिक यांनी केले होते. त्यामुळे जुनीच राजकीय (politics)समीकरणे पुढे आली आहेत. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि महायुती अंतर्गत छुपा संघर्ष आतापासूनच पाहायला मिळतो आहे. महाडिक कुटुंबीयांना या संघावर स्वतःची हुकूमत पुन्हा अधोरेखित करावयाची आहे.आणि त्याची पूर्वतयारी सध्या त्यांच्याकडून सुरू आहे.महायुतीच्या नेत्यांनी नवीद मुश्रीफ यांना गोकुळचे अध्यक्ष म्हणून दुग्धाभिषेक घातल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या शौमीका महाडिक या सत्ता वर्तुळात आल्या पण नवीद मुश्रीफ यांनी आवाहन करूनही संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या सत्ताधारी म्हणून व्यासपीठावर बसल्या नाहीत.

विरोधक म्हणूनच त्यांनी आपली मते मांडली, प्रश्न मांडले, मागण्या मांडल्या. गेल्या चार वर्षांपासून आपण दूध उत्पादकांच्या वतीने जे प्रश्न मांडले, ज्या मागण्या केल्या त्यापासून शेवटच्या वर्षात माघार घेता येत नाही असे त्यांचे म्हणणे असले तरी त्यांना नवीद मुश्रीफ यांच्यावरील अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक मनापासून पटलेला नाही, रुचलेला नाही. याशिवाय हसनमुश्रीफ आणि सतेज पाटील हे एकत्रच असल्याचे चित्र वार्षिक सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. एकूणच दूध संघात जुनीच राजकीय समीकरणे अबाधित राहिल्याने महायुतीचे तोरण असूनही महाडिक गटाची राजकीय(politics) अडचण झाली आहे आणि ही अडचण गुरुवारच्या मोर्चामुळे स्पष्टपणे पुढे आली. सुमारे 4000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली सर्वात मोठी व्यापारी सहकारी संस्था म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारणाचे प्रवेशद्वार समजले जात असल्याने प्रस्थापित राजकारण्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून घरच्याच सदस्यांची वर्णी गोकुळच्या संचालक मंडळावर लावलेली आहे.


अनेक वर्षांपासून गोकुळ दूध संघावर महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. ते म्हणल ती पूर्व दिशा अशी परिस्थिती तेथे पाहायला मिळत होती. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन गोकुळ दूध संघावर निवडणूक जिंकून कब्जा मिळवला. महाडिक गटाची सत्ता हद्दपार केली. मात्र काही महिन्यापूर्वी अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गोकुळ मधील सत्ताकारण बदलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप करून गोकुळ दूध संघावर महायुतीचे तोरण बांधले. तथापि नविद मुश्रीफ यांना अध्यक्षपदावर विराजमान केल्यामुळे राजकारणाची जुनीच समीकरणे पुढे आली आणि ती महाडिक गटाला आवडलेली नाहीत.


गोकुळ दूध संघामध्ये दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांच्या देयकातून डिबेंचर म्हणून काही रक्कम कपात केली जाते आणि हे काही नवीन नाही. पण यंदा कपात केलेल्या रकमेची टक्केवारी वाढल्यामुळे संस्थाचालक आणि उत्पादक संतप्त झाले. त्यांचा हा असंतोष संचालिका शौमिका महाडिक यांनी संघटित केला आणि गुरुवारी दूध संघाच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशा प्रकारचा हा पहिलाच मोर्चा समजला जातो. या मोर्चात प्रतिकात्मक म्हणून एक म्हैस आणली होती. या म्हशीला एका पोलीस कर्मचाऱ्यांनी लाथ मारल्याचे निमित्त झाले आणि मोर्चातील निदर्शक संतप्त बनले. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून संघाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी निदर्शकांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळले.


अर्थात हा मोर्चा काढण्यामागे दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचा हेतू होता हे मान्यच करावे लागेल. गोकुळ दूध संघावरची सत्ता हातातून निघून गेल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून महाडिक गट अस्वस्थ आहे.शौमिका महाडिक यांच्या(politics) आक्रमक भूमिकेमुळे ही अस्वस्थता वारंवार स्पष्ट झाली आहे. महाडिक गटाचे पारंपरिक राजकीय शत्रू सतेज पाटील यांच्याकडून गोकुळ दूध संघाची सत्ता निर्विवादपणे महाडिक गटाला मिळवावयाची आहे. त्यामुळे महायुतीसमोर या निवडणुकीत धर्म संकट आहे. गोकुळ दूध संघामध्ये युती धर्म पाळायचा की महाडिक गटाचा हट्ट पुरवायचा अशी द्विधा मनस्थिती महायुतीच्या नेत्यांची बनली आहे. महायुती म्हणून गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवायची की पॅनल सिस्टिमला मान्यता द्यायची? या प्रश्नाचे नेमके उत्तर नजीकच्या काळात मिळणार आहे.

हेही वाचा :

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त…

‘त्यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार…’; धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप..

आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीने आता केलं लग्न, पतीसोबत शेअर केला फोटो..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *