इचलकरंजी शहराला हादरवणारी घटना सोमवारी मध्यरात्री घडली. बारमध्ये वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून एका बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक(manager) अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय 44, रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कबनूर) यांचा सिमेंटच्या नळ्याने डोक्यात प्राणघातक वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना कबनूर-कोल्हापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर घडली.

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासांत खुनाचा छडा लावला. पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना अटक केली असून त्यामध्ये पंकज संजय चव्हाण (27, रा. फॅक्टरी रोड, कबनूर), रोहित जगन्नाथ कोळेकर (24, रा. कागल), विशाल राजू लोंढे (31) आणि आदित्य संजय पोवार (21, रा. लालनगर, इचलकरंजी) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.
अभिनंदन कोल्हापुरे हे एका नामांकित बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक (manager)म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास संशयित पंकज चव्हाण हा काही मित्रांसह त्यांच्या घरी आला आणि “हॉटेल वैशाली येथे वाद झाला असून पोलिस ठाण्यात यावे लागेल” असे सांगून त्यांना सोबत घेऊन गेला. मात्र बराच वेळ तो परतला नाही. त्यामुळे अभिनंदन यांचा भाऊ डॉ. अभिषेक कोल्हापुरे आणि कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता कबनूर येथील पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. डॉ. अभिषेक यांनी तपासल्यावर ते मृत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून जयसिंगपूर रस्त्यावरील चौंडेश्वरी फाटा येथे चौघाही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत उघड झाले की, हॉटेल वैशाली येथे रोहित कोळेकर हा वेटर म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी अभिनंदन यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्याने शिवीगाळ केल्याचा राग आल्याने कोळेकर याने पंकज चव्हाण व इतर साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी घटनास्थळावरून सिमेंटचा नळा जप्त केला असून, पंकज चव्हाण हा यापूर्वीही दोन गुन्ह्यांमध्ये अटक झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे इचलकरंजी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अभिनंदन कोल्हापुरे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा :
लोणचे प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे की काचेच्या बरणीत? जाणून घ्या..
‘मी अश्वत्थामाच जो कधीच…’, श्रेयस अय्यर असं का म्हणाला…
आजचा बुधवार ‘या’ राशींसाठी लकी…