रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. कधी फळभाज्या खाल्ल्या जातात तर कधी पालेभाज्या खाल्या जातात. पण लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांची साल काढल्यानंतर ती लगेच फेकून दिली जाते. दुधी भोपळा(pumpkin), लाल भोपळा, बटाटा इत्यादी अनेक भाज्या घरात आणल्यानंतर त्यांची साल काढून फेकून दिली जाते. पण दुधी भोपळ्याची साल टाकून न देता तुम्ही त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुधी भोपळ्याच्या सालीची चटकदार चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दुधी भोपळा आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक आहे. यामध्ये भरपूर पाणी असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर दुधी भोपळ्याचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण घरातील मुलांना किंवा मोठ्यांना दुधी भोपळा खायला आवडत नसेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सालींची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.

साहित्य:
दुधी भोपळ्याची साल
हिरवी मिरची
आलं
लसूण
मीठ
लिंबाचा रस
जिरं
हिंग
कोथिंबीर
तेल
कृती:
दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून फोडणी भाजा.त्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या साली, हिरवी मिरची, आलं, लसूण घालून मंद आचेवर परतून घ्या. भाजीला एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करा.तयार केलेले भाजीचे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्या.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.
जेवणात डाळ भात किंवा चपाती बनवल्यानंतर तुम्ही दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी खाऊ शकता.

हेही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना…
राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीत असणार ‘दिलसे’…! निवडणुकीत येणार रंगत
अभिनेते जितेंद्र जागीच कोसळले; प्रार्थना सभेतील व्हिडीओ समोर…