ऑस्ट्रेलियाने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १० डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत, आता १६ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम(Instagram), टिकटॉक आणि स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर हा नियम कठोरपणे लागू केला जाणार असून, हा जगातील पहिला राष्ट्रीय कायदा ठरणार आहे जो मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर मर्यादा घालतो. नियमांचे उल्लंघन केल्यास कंपन्यांना तब्बल ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच सुमारे ₹२७० कोटींचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

या कायद्याअंतर्गत, अल्पवयीन युजर्सची खाती कायमस्वरूपी बंद करण्यापूर्वी त्यांना तीन पर्याय देण्यात येतील — स्वतःचा डेटा डाउनलोड करणे, प्रोफाइल तात्पुरते निष्क्रिय ठेवणे किंवा खाते पूर्णपणे डिलीट करणे. युजर्सचे वय पडताळण्यासाठी कंपन्या एआय-आधारित प्रणालींचा वापर करतील, ज्या युजरच्या लाईक्स, कमेंट्स आणि वापराच्या पद्धतींवरून वयाचा अंदाज लावतील. चुकीने अल्पवयीन ठरवले गेलेल्या युजर्सना अपील करण्याची संधी दिली जाईल, ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून वयाची पुष्टी केली जाईल.
‘योटी’ (Yoti) नावाच्या कंपनीकडून फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram)आणि टिकटॉकसाठी ही वय पडताळणी तंत्रज्ञान सेवा पुरवली जाणार आहे. कंपनीने सांगितले की, नवीन प्रणाली सुरळीत चालू होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. दरम्यान, टिकटॉकच्या मते सध्या १३ ते १५ वयोगटातील सुमारे दोन लाख ऑस्ट्रेलियन युजर्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामुळे या बदलाचा त्वरित परिणाम या युजर्सवर होणार आहे.
तज्ञांच्या मते, ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय जागतिक स्तरावर एक आदर्श निर्माण करू शकतो. येत्या २०२६ पर्यंत अनेक देश ऑस्ट्रेलियाच्या या मॉडेलचे अनुकरण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कायद्यामुळे ऑस्ट्रेलिया आता जगातील पहिला देश ठरणार आहे, ज्याने अल्पवयीनांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर अधिकृतपणे मर्यादा घातल्या आहेत.

हेही वाचा :
समंथाच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त टिप्पणी, अखेर मंत्र्याचा माफीनामा; नाग चैतन्यसह नागार्जुनही भडकलेले
आज सोनं पुन्हा झालं स्वस्त; दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा तोळ्याचा भाव
महिला बनणार ठाणेदार! भाजपा, शिंदेसेना, पवार गटाला धक्का…