तामिळनाडूच्या फटाका कंपनीत भीषण स्फोट
शिवकाशी: तामिळनाडूच्या शिवकाशीमद्ये गुरूवारी एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला. यात पाच महिलांसह ८ मजुरांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जखमी झाले. ही घटना भारताचे फटाका केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकाशीमध्ये घडली. येथील विरुधुनगर जिल्ह्यात शिवकाशीजवळ सेंगामालापट्टीस्थित एका खाजगी फटाका कंपनीत आग लागली.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार हा स्फोट झाला तेव्हा फटाका कंपनीत १० कामगार होते. याआधी फेब्रुवारीमध्ये विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका कंपनीत झालेल्या स्फोटात चार महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत मृत व्यक्तींबाबत शोक व्यक्त केला होता.
दरम्यान, या घटनेप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य प्रकारचे उपचार पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार ज्या सात रूममध्ये फटाके ठेवले होते ते पूर्णपणे जळून खाक झाले.