पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर ( जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटनांनंतर विद्यार्थ्यांच्या(school) सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ परिसरातून पायी शाळेत जाणाऱ्या मुलांवरील धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हिवाळा सुरू झाल्यामुळे लवकर अंधार पडू लागला असून यामुळे शाळेतून घरी परतताना विद्यार्थ्यांना अंधारात प्रवास करावा लागत होता. या काळात बिबट्यांच्या हालचालीही वाढत असल्याने मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बिबट्यांचा वावर असलेल्या शाळांच्या वेळेत तत्काळ बदल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर , नगर आणि इतर ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत बिबट्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक विद्यार्थी शाळा घरापासून १ ते ३ किलोमीटर अंतरावर असताना ऊस शेती, जंगल, डोंगराळ किंवा विरळ लोकवस्ती असलेल्या रस्त्यांवरून पायी प्रवास करतात. सध्या ऊस तोडणीच्या हंगामामुळे शेतीची दाटी कमी झाल्याने बिबट्यांना हालचाल सोपी झाली आहे आणि धोका आणखी वाढला आहे.या सर्व परिस्थितीचा विचार करून बिबट्याप्रवण क्षेत्रातील शाळांची(school) वेळ बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता शाळा सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचावे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीनंतर नवी वेळ तात्काळ लागू करण्याचे आदेश आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सर्व शाळांमध्ये सुरक्षा जनजागृती कार्यक्रम अनिवार्य केले आहेत. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना बिबट्याचा धोका, प्रवासातील खबरदारी, समूहाने चालण्याचे महत्त्व आणि धोक्याच्या प्रसंगी कसे वागावे या बाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.याशिवाय पालक-शिक्षक सभांचे आयोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः सकाळी व संध्याकाळी असुरक्षित भागांमध्ये मुलांना एकटे पाठवू नये, त्यांना सोबत करावे, अशा सूचना पालकांना दिल्या जाणार आहेत. वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचला आहे याची खात्री करणे हे त्यांच्या जबाबदारीत समाविष्ट करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक पायाभूत सुविधा विकास समितीने दर महिन्याला बैठक घेऊन वाढीव सुरक्षाव्यवस्था, आवश्यक सुविधा आणि उपाययोजनांवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. समायोजित वेळ लागू केलेल्या शाळांची संख्या तात्काळ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कळवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा :
9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार
विकी-कतरिनाच्या बाळाचा फोटो होतोय व्हायरल, पण…
आज १९ नोव्हेंबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य