2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेत एकूण 1 लाख 20 हजार 579 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. ही देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील भरतींपैकी एक मानली जाते. 2024 मध्ये 92 हजार 116 तर 2025 मध्ये 28 हजार 463 पदांसाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. काय म्हणाले केंद्रीय रेल्वेमंत्री? सविस्तर जाणून घेऊया.
गेल्या 11 वर्षांत 5 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या 2014-15 ते 2024-25 या कालावधीत रेल्वेने 5 लाख 8 हजाराहून अधिक नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. याच्या तुलनेत 2004-14 या दहा वर्षांत केवळ 4 लाख 11 हजार भरती झाल्या होत्या. म्हणजेच मोदी सरकारच्या काळात रेल्वेतील रोजगार निर्मितीत लक्षणीय वाढ झाल्याचे यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणाले.
लोको पायलट ते ट्रॅक मेंटेनर पर्यंत विविध पदे
या भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट (18 हजार 799), टेक्निशियन, ज्युनियर इंजिनिअर, एनटीपीसी (पदवीधर व पदवीपूर्व), आरपीएफ सब-इन्स्पेक्टर (452), कॉन्स्टेबल (4208), पॅरामेडिकल स्टाफ, लेव्हल-1 ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन अशी सुरक्षा, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणीतील पदे समाविष्ट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोट्यवधी उमेदवारांनी दिल्या परीक्षा
विशेष म्हणजे, एनटीपीसी पदवीपूर्व स्तराच्या 3445 पदांसाठी विक्रमी 63 लाख 27 हजार अर्ज आले. आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी 45 लाख 30 हजार, एनटीपीसी पदवीधरसाठी 58 लाख 41 हजार, लोको पायलटसाठी 18 लाख 40 हजार असे कोट्यवधी उमेदवार सहभागी झाले. परीक्षा 15 भाषांमध्ये 140 हून अधिक शहरांत घेण्यात आल्या.
59 हजार पदांसाठी सीबीटी
59 हजार 698 पदांसाठी पहिल्या टप्प्याची कॉम्प्युटर परीक्षा पूर्ण झाली. लोको पायलट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निशियन, पॅरामेडिकल, आरपीएफ सब-इन्स्पेक्टर अशा पदांसाठी 23 हजारहून अधिक उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार झाली आहे. लवकरच नियुक्तीपत्रे वितरित होणार आहेत.
भरती प्रक्रिया
रिक्त जागा सतत निर्माण होत असल्याने भरती ही रोलिंग पद्धतीने चालते. कोणताही पेपर लीक किंवा अनियमितता झालेली नाही. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. लेव्हल-1 आणि आरपीएफ कॉन्स्टेबलच्या पुढील टप्प्याच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये सुरू आहेत.