Solapur शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे. (gutkha) राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहरातील चौकाचौकांवरील टपऱ्यांमध्ये मावा सहजपणे उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणाई या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्यसन जडलेल्या अनेक तरुणांकडून दिवसाला दोन ते तीन पाकिटांचा वापर होत असल्याची माहिती मिळत आहे. मावा न मिळाल्यास अस्वस्थता जाणवते, चिडचिड वाढते आणि मानसिक ताण निर्माण होतो, अशीही परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत (gutkha) प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अलीकडेच माव्याच्या अतिसेवनामुळे एका तरुणाला तोंडाचा कॅन्सर झाल्याची घटना समोर आली होती. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने तो मृत्यूच्या दाढेतून परतला असून आता तोच इतर तरुणांना या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे.मावा तयार करताना निकृष्ट दर्जाची सुपारी, चुना, कात आणि इतर घातक द्रव्यांचा वापर केला जातो. ‘किक’ वाढवण्यासाठी काही ठिकाणी आणखी घातक पदार्थ मिसळले जात असल्याचीही चर्चा आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा पदार्थांमध्ये मॅग्नेशियम कार्बोनेटसारखे रसायन तसेच तंबाखूमधील कार्सिनोजेन्स असतात, जे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. तोंड, जीभ, घसा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका माव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो.
दरम्यान, मावा विक्रेत्यांनी (gutkha) फ्रँचायझी पद्धतीने व्यवसाय विस्तारल्याची माहिती समोर येत आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी केवळ दिखाऊ कारवाई होते आणि त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते, अशी नाराजी व्यक्त होत आहे.तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या घातक प्रवृत्तीवर तातडीने लगाम घालावा, गुटखा आणि मावा विक्रीवर कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डॉक्टरांनीही स्पष्ट इशारा दिला आहे की, कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर मावा किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांपासून पूर्णतः दूर राहणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…