महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पुणे, ठाणे आणि नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल्स बंद झाली आहेत. लग्नसराईच्या काळात केटरर्स हतबल झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट महाराष्ट्राला बसू लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटावर मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, सोलापूर आणि धुळे यांसारख्या प्रमुख शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. राज्यातील अनेक प्रसिद्ध हॉटेल्सनी गॅस नाही असे बोर्ड लावून आपले व्यवसाय बंद केले आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा फटका आता मुंबईतील खाद्यसंस्कृतीला बसू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील फोर्ट परिसरातील १७८ वर्षे जुन्या पंचम पुरीवाला हॉटेलमध्ये गॅसच्या कमतरतेमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. १८४८ पासून कार्यरत असलेल्या या हॉटेलमध्ये साधारण ७९ प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. मात्र आता केवळ ‘पुरी-भाजी’ आणि ‘आमरस-पुरी’ असे दोनच पदार्थ ग्राहकांना मिळत आहेत. मर्यादित गॅस साठ्यामुळे व्यवस्थापनाला ओळखीच्या लोकांकडून सिलिंडरची मदत घ्यावी लागत असून, या परिस्थितीमुळे हॉटेलच्या दैनंदिन उत्पन्नावरही गंभीर परिणाम झाला आहे.
पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले प्रसिद्ध बादशाही हॉटेल गॅसअभावी बंद झाले आहे. बादशाही हॉटेलने हॉटेलबाहेर गॅस संपल्याचा बोर्ड लावला आहे. (Maharashtra) यामुळे खवय्ये हताश होऊन परतत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यातही अशीच परिस्थिती उद्भवली आहे. कोपरी येथील शिवम हॉटेल गॅसअभावी बंद करण्यात आले आहे. यानंतर केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर सँडविच आणि पिझ्झा दिला जात आहे. मात्र, चहा-नाश्ता आणि जेवण बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाणे खोपट एसटी डेपोतील कॅन्टीनमध्येही गॅस नसल्याने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
नागपुरातील खापरी येथील एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. केवळ घरगुती सिलेंडरवर भर दिला जात आहे. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्र अडचणीत आले आहे. आश्चर्य म्हणजे मंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या रवि भवन मधील व्हीव्हीआयपी कॅन्टीनलाही सिलेंडर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra) त्यामुळे त्यांनी चार-चार इलेक्ट्रिक शेगड्या लावून जेवण बनवण्याची कसरत सुरु केली आहे.
ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा तुटवडा जाणवल्याने केटरर्स व्यावसायिक हतबल झाले आहेत. नागपूरचे केटरर्स दीपक मिश्रा यांनी सांगितले की हजारो लोकांसाठी चुलीवर जेवण बनवणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या ऑर्डर्सचे ॲडव्हान्स पैसे परत करत आहोत. लग्नसराईत काम करणाऱ्या मजुरांच्या हाताचे कामही यामुळे गेले आहे.
भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीमध्ये १२०० विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवले जाते. मात्र आता केवळ दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याने शाळा प्रशासन धास्तावले आहे. गॅस न मिळाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुलीवर जेवण कसे बनवायचे, असा सवाल मुख्याध्यापक नरेंद्र पालांदुरकर यांना पडला आहे.
तर उन्हाळ्याच्या कडाक्यात चुलीवर काम करणे कामगारांना शक्य नाही, असे धुळ्यातील हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे. सोलापूरमधील छोटे हॉटेल व्यावसायिक बळीराम जांभळे यांच्यासारख्या अनेकांचे २१ लोकांचे कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे, जे आता धोक्यात आले आहे. (Maharashtra) तसेच रत्नागिरीत युद्धामुळे गॅस टंचाई अधिक वाढेल या भीतीने घरगुती ग्राहकांनी गॅस एजन्सीबाहेर पाच-पाच दिवस रांगा लावल्या आहेत. शांतादुर्गा गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर