मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. (mumbai)अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक वस्तू या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. दरम्यान, मुंबईत मागील 24 तासांत तब्बल 350 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांमधील पाणी उपसा करण्यासाठी मुंबई (mumbai)महापालिकेचे 525 पंप पाणी काढण्यासाठी लावण्यात आले होते. गरजेनुसार आणखी पंपांची वाढ करण्यात यावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आपत्कालीन कक्षाला दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याआधी बुधवारी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील आपत्कालीन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन कक्षाच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर आणि विक्रोळीतील पार्कसाईट या दरडप्रवण क्षेत्रांनाही त्यांनी भेट दिली. या भागांतील स्थितीबाबत स्थानिक रहिवाशांकडून माहिती घेतली आणि प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
6 मुख्य व 10 लहान उदंचन केंद्र सक्रिय
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबईत 6 मुख्य उदंचन केंद्रे आणि 10 लहान उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच पाणी उपसा करण्यासाठी 525 पंप कार्यान्वित असून गरजेनुसार ही संख्या वाढवली जाईल. ‘मुंबईकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तातडीने सर्व उपाययोजना कराव्यात’ असे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
लोणावळ्यात पावसाने सर्व विक्रम मोडले
लोणावळा शहरात गेल्या 24 तासांत 432 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभरही पावसाचा तेवढ्याच तीव्रतेने सुरू राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी आतापर्यंत लोणावळ्यात एकूण 4810 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच दिवशीपर्यंत ही आकडेवारी फक्त 4514 मिमी इतकी होती. मात्र यावर्षी लोणावळ्यात पावसाने सर्वच विक्रम मोडीत काढले आहे. यावर्षी मागील 24 तासांत विक्रमी 432 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी