सांगलीतील जुनी धामणी येथे दोन बिहारी मजुरांतील वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

जुनी धामणी (ता. मिरज) येथील स्माशनभूमीचा घाट बांधण्यासाठी आलेल्या दोन बिहारी मजुरांत झालेल्या वादातून मित्राने मित्राचा गळा चिरून खून केला. काल रात्री अकराच्या सुमारास धामणीतील नदीकाठावर ही घटना घडली. (police) यात विनायक कुमार बालेश्वर चौधरी (वय २२, मूळ जखरा वॉर्ड क्र. २, चंपारण, बिहार, सध्या जुनी धामणी) या मजुराचा खून झाला. गेल्या ७२ तासांत पाचवा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, सांगली ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विनायकचा मित्र संशयित सोनू कुमार नाथूसहानी (वय २१, तेलुहा वॉर्ड ०२, पश्चिम चंपारण, बिहार) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत विनायक कुमार आणि संशयित सोनू कुमार हे दोघे मित्र असून बिहारमधून कामासाठी महाराष्ट्रात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आलास (ता. शिरोळ) येथे स्मशानभूमीच्या घाटाचे काम सुरू असताना किरकोळ कारणातून मृत विनायक कुमार आणि संशयित सोनु कुमार यांच्यात वाद झाला. तेव्हा विनायकने त्याला मारहाण केली. तेव्हा सोनूने त्याला धमकी दिली होती. (police) तेव्हा इतर साथीदारांनी त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता. परंतु सोनूच्या मनात हा राग धुमसत होता. विनायकने सोनूचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखी भर पडली होती. या कारणावरून त्यांच्यात धुसफूस सुरू होती.
दरम्यान, आलास येथील कामानंतर काही दिवसांपासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचे काम सुरू होते. त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी याने सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले होते. घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते. काल रात्री नऊच्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते. तेव्हा विनायक आणि सोनू हे दोघेजण घाटाकडे गेले होते. तेव्हा दोघांत वाद झाला. सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्या जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर सोनूने आणखी एक कामगार मिथुन कुमार याला बोलवून रात्री साडेदहाच्या सुमारास घाटाकडे नेले. तेथे गेल्यानंतर मृतावस्थेत पडलेल्या विनायकला त्याला दाखवले. त्याचा मृतदेह नदीत फेकून देण्यासाठी मदत मागितली. त्यावेळी मिथुनने त्याला नकार दिला. तो तेथून निघाला. घडला प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला. तेव्हा नागेंद्रने सेंट्रिंग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे (बोरगाव, ता. वाळवा) यांना याबाबत कळवले.बुरंगे यांनी रात्री साडेअकरा वाजता जुनी धामणी येथे येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचे दिसले. सांगली ग्रामीण पोलिसांना याबाबत कळवताच, (police) त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पंचनामा केला. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोनूला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. कंत्राटदार सुशांत बुरंगे यांची फिर्याद नोंदवली आहे.
हेही वाचा :
जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक
गुगलचं मोठं अपडेट, आता जीमेलमध्ये करु शकता ‘हा’ महत्त्वाचा बदल