गेल्या काही महिन्यांपासून आकाशाला गवसणी घालणाऱ्या सोन्याच्या किंमती (Gold prices) आता खाली येण्यास सुरुवात झाली आहे. सराफा बाजारात एक लाखांचा टप्पा पार केलेल्या सोन्याच्या किंमतीत आता झपाट्याने घसरण होत आहे. वायदे बाजारात सोन्याची किंमत तब्बल 3% नी घसरून 3,281.6 डॉलर प्रति औंसवर आली असून, अमेरिकन फ्युचर्समध्ये 3.7% घसरणीसह 3,294.10 डॉलरवर व्यवहार थांबले. काही तज्ज्ञांनी यापूर्वीच असा इशारा दिला होता की, सोन्याच्या किंमती भविष्यात 55 हजारांवर येऊ शकतात.

अवघ्या काही वर्षांपूर्वी हजारांमध्ये मिळणारे सोने(Gold prices) आज लाखाच्या घरात पोहोचले होते. लग्नसराईमुळे वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम या किंमतींवर दिसून आला. मात्र, वायदे बाजारात दिसलेल्या अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत झाला किंवा अमेरिकेने टॅरिफमध्ये कोणताही मोठा निर्णय घेतला नाही तर पुढील काळात सोन्याच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात.
एप्रिल महिन्यात वायदे बाजारात सोन्याने जोरदार उसळी घेतली होती. तब्बल 900 डॉलरची वाढ नोंदवली गेली होती, त्यापैकी 500 डॉलरची झेप फक्त एप्रिलमध्येच घेतली गेली. मात्र त्यानंतर अचानक आलेल्या घसरणीने बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. एक लाख रुपयांच्या घरात पोहोचलेले सोने आता पुन्हा उतरती कळा लागले आहे.
सराफा बाजारात मात्र अजूनही किंमती तुलनेत जास्तच आहेत. 24 कॅरेट सोने 96,085 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर 22 कॅरेट सोने 88,014 रुपये आहे. 18 आणि 14 कॅरेटचे दर अनुक्रमे 72,064 आणि 56,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. चांदीचा भावही वाढत 96,613 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मात्र या किंमतींमध्ये जीएसटी आणि इतर शुल्क समाविष्ट असल्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी तुलना करता येत नाही.

सोने घसरत असल्याचे स्पष्ट संकेत सध्या वायदे बाजारात दिसून येत आहेत. काही आर्थिक तज्ज्ञांनी यापूर्वीच भाकीत केलं होतं की, सोने भविष्यात 55 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
सध्या बाजारातील हालचाली त्या दिशेनेच होत असल्याने ही भविष्यवाणी खरी ठरेल का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…
अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’
हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक