भारतातील मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये वेगाने वाढ होत आहे. या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, ऑटो क्षेत्रातील दिग्गज Tata, Mahindra आणि Renault पुढील काही महिन्यांत त्यांच्या नवीन एसयूव्ही बाजारात आणण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या लाँचची(launch) अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी पुढील 6 ते 9 महिन्यांत तीन शक्तिशाली वाहने भारतीय रस्त्यांवर धावताना दिसतील, अशी शक्यता ऑटो तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आगामी एसयूव्हीमध्ये ग्राहकांना शक्तिशाली इंजिन, प्रगत वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाइनचे उत्कृष्ट संयोजन मिळेल.

महिंद्रा XUV700 फेसलिफ्ट
महिंद्रा कंपनी त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या XUV700 एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. हे वाहन 2026 च्या सुरुवातीला लाँच (launch)केले जाण्याची शक्यता आहे. या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये ग्राहकांना नवीन डिझाइन, अपडेटेड इंटीरियर आणि अनेक हाय-टेक फीचर्स मिळतील. मात्र, कंपनी त्याच्या इंजिन पर्यायांमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या मॉडेलप्रमाणे, यामध्येही 2.0 लिटर पेट्रोल आणि 2.2लिटर डिझेल इंजिनचा पर्याय कायम राहील.
टाटा सिएराचा नवा अवतार
टाटा मोटर्स त्यांची आयकॉनिक एसयूव्ही सिएरा एका नवीन अवतारात भारतीय बाजारात लाँच करणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती लाँच होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला, कंपनी तिचे इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) बाजारात आणेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट देखील सादर केले जातील. सिएराचा हा नवीन अवतार विशेषतः अशा ग्राहकांना आकर्षित करेल, जे स्टाईल आणि टिकाऊपणा या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देतात.
रेनॉल्ट डस्टर (नवीन पिढी)
रेनॉल्ट भारतात त्यांच्या लोकप्रिय डस्टर एसयूव्हीची नवीन पिढी सादर करण्याची योजना आखत आहे. 2026 च्या सुरुवातीला लाँच होणारी ही गाडी CMF-B+ मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. पहिल्या टप्प्यात, ही एसयूव्ही पेट्रोल इंजिनसह लाँच केली जाईल. त्यानंतर कंपनी तिची हायब्रिड आवृत्ती देखील सादर करू शकते. डिझाइन आणि कामगिरीच्या बाबतीत नवीन डस्टर जुन्या मॉडेलपेक्षा खूपच प्रगत असेल.
महिंद्रा, टाटा आणि रेनॉल्टच्या या तीन आगामी एसयूव्ही भारतीय ग्राहकांना स्टाईल, पॉवर आणि तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट पॅकेज देतील. येत्या काही महिन्यांत एसयूव्ही विभागातील स्पर्धा आणखी तीव्र होईल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय आणि वैशिष्ट्यांनी भरलेल्या कार मिळतील.
हेही वाचा :
आता फक्त ५० रुपयांत होणार जेवणाची डिलिव्हरी!
मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न
नवरात्रीत एसटी महामंडळाची भन्नाट योजना….