इचलकरंजी (प्रतिनिधी) :
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका नागरिकांना मोठी दिलासा देणारी योजना घेऊन आली आहे. ‘मोठा सण मोठी सवलत – अभय योजना’ या अंतर्गत मालमत्ता कराच्या व्याजावर मोठ्या प्रमाणात सवलतीची घोषणा करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता करदारांना ठराविक कालावधीत कर भरल्यास व्याजात सवलत दिली जाणार असून, ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
सवलतींचे वेळापत्रक असे –
९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर : ९०% व्याज सवलत
१६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर : ७५% व्याज सवलत
४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर : ५०% व्याज सवलत
१९ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर : २५% व्याज सवलत
योजनेच्या अंमलबजावणीनंतर नागरिकांना मालमत्ता कर वसुलीमध्ये मोठा दिलासा मिळणार असून, थकबाकीदार करदात्यांना आपले संपूर्ण कर व व्याज भरून सवलतीचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे की, “आपला मालमत्ता कर संपूर्ण भरा व व्याजावर ९०% पर्यंत सवलत मिळवा”.
या योजनेची माहिती देताना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी सांगितले की, कर वसुलीत पारदर्शकता आणून नागरिकांना दिलासा देणे हेच उद्दिष्ट आहे. करदात्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
ही योजना केवळ ठरविलेल्या कालावधीपुरती मर्यादित असणार आहे. त्यामुळे करदात्यांनी विलंब न लावता मालमत्ता कर भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
