पृथ्वीवर ‘शुभ’ अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

नवी दिल्ली : भारताच्या आगामी अवकाश मोहिमांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या(terms) ‘अ‍ॅक्सिओम-४’ मोहिमेची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी पृथ्वीवर सुखरूप परतले. ‘ग्रेस ड्रॅगन’ अंतराळयानाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनाऱ्याजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समुद्रात यशस्वी ‘लँडिंग’ केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण देशवासीयांनी या घटनेबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले, तर शुभांशूच्या आई-वडिलांच्या मनात कृतार्थतेची भावना दाटून आली.अंतराळातून ‘‘आजही भारत सारे जहाँसे अच्छा दिसतो,’’ अशा भावना व्यक्त करणारे आणि देशातील आगामी अंतराळवीरांसाठी प्रेरणा ठरलेले (terms) शुक्ला आणि त्यांचे तीन सहकारी यानातून बाहेर आले आणि त्यांनी हसतमुख चेहऱ्याने कॅमेऱ्याकडे पाहून हात हालविला.

शुभांशू यांचा हा ‘व्हिडिओ’ काही क्षणातच व्हायरल झाला. या अंतराळवीरांनी एकूण २२.५ तास प्रवास केला. शुभांशू शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, आणि मोहिमेचे विशेषज्ञ स्लावोश उझनान्स्की-व्हिस्निएव्हस्की  आणि टिबोर कापूयांनी सोमवारी दुपारी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून अंतराळयानातून (terms) आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. ‘‘ड्रॅगन अंतराळयानाचे पाण्यात यशस्वी लँडिंग झाले. पृथ्वीवर परत आल्याबद्दल स्वागत,’’ असे ‘स्पेस एक्स’ने ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. अंतराळयानाला ‘शॅनॉन’ या रिकव्हरी शिपकडे नेण्यात आल्यानंतर तेथून त्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले. ‘अ‍ॅक्सिओम-४’चे अंतराळवीर हेलिकॉप्टरने किनाऱ्यावर परत जाण्यापूर्वी जहाजावरच त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हे चारही अंतराळवीर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली जीवनाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी अंदाजे सात दिवस विशेष कक्षात वास्तव्य करणार आहेत.

आई-वडिलांना अश्रू अनावर
लखनौ ः शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवरून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांचे आई-वडील शंभू दयाल शुक्ला आणि आई आशा देवी यांना अश्रू अनावर झाले. बहीण सूची मिश्रा यादेखील भावनावश झाल्या होत्या. सर्व कुटुंबीयांनी आनंदाने आणि समाधानाने शुभांशू पृथ्वीवर परतल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. ‘‘तो अंतराळात गेला होता आणि परत आला आहे. आम्हा सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे. देशाच्या आगामी गगनयान मोहिमेसाठी हा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे,’’ असे शंभू दयाल शुक्ला यांनी सांगितले. शुभांशू परतल्यानंतर आई आशादेवी यांनी हातात तिरंगा घेऊन फडकवला. मुलाच्या अद्वितीय कर्तृत्वामुळे त्यांचा ऊर भरून आला होता.

असा झाला परतीचा प्रवास
– शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन ‘ग्रेस ड्रॅगन’ अंतराळयान भारतीय वेळेनुसार सोमवारी  सायंकाळी ४.५० वाजता निघाले.

– बावीस तासांपेक्षा जास्त काळाच्या प्रवासानंतर मंगळवारी ‘ग्रेस ड्रॅगन’ अंतराळयान भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:०१ वाजता दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनाऱ्यावर समुद्रामध्ये उतरले. वीस दिवसांच्या अंतराळ प्रवासात अठरा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीरांचे वास्तव्य होते.

– पाण्यात उतरल्याबरोबरच अंतराळयानाला ‘शॅनॉन’ या जहाजावर ठेवण्यात आले. तिथे ‘अ‍ॅक्सिऑम-४’चे अंतराळवीर एका लहान

घसरणीवरून बाहेर येऊन जमिनीवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने उभे राहिले.

– शुभांशू यांच्यासह इतरांनी आनंदी चेहऱ्याने कॅमेऱ्याच्या दिशेने पाहून हात हलविला.

– शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेत असताना त्यांच्या हालचाली सावध होत्या

– अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी झाली, त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून किनाऱ्यावर नेण्यात आले.

– पृथ्वीवर पुन्हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली जुळवून घेण्यासाठी हे चारही अंतराळवीर सुमारे सात दिवस विशेष कक्षात वास्तव्य करतील.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परत आल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत. सर्व देशवासीयांच्या आनंदात आज मी सहभागी झालो आहे. अंतराळवीर शुक्ला यांनी आपली निष्ठा, धैर्य आणि परिस्थितीशी दोन हात करण्याच्या वृत्तीतून अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हेही वाचा :