सावधान! राज्यातील ‘या’ भागाला हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत हवामान(weather) विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकणासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांत मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट होण्याची शक्यता हवामान(weather) खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी यलो अलर्ट :
हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, या भागांमध्ये देखील वाऱ्याचा जोर आणि विजांचा धोका वाढलेला आहे. सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी झाडांच्या खाली थांबणे टाळावे आणि विजेच्या तारा, सैल झालेली संरचना यांपासून दूर राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

पालघरमध्ये देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मच्छीमार, शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट; नद्या दुथडी भरून वाहण्याचा धोका :
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील भागांत पावसाचा जोर अधिक असणार आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, कारण पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, महत्त्वाच्या वस्तू जवळ ठेवणे, आणि संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवणे या गोष्टींवर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांसाठी सूचना:
– समुद्रकिनाऱ्याच्या जवळ न जावं

– सार्वजनिक ठिकाणी पाणी साचलेल्या जागांपासून दूर राहावं

– सोशल मीडियावर अधिकृत हवामान अपडेट्स पाहूनच निर्णय घ्यावेत

– गरज असल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं

हेही वाचा :