खिद्रापूर(Khidrapur) (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि कलात्मक वैभवाने नटलेले भगवान कोपेश्वर मंदिर बुधवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळ्या’ने उजळून निघणार आहे. वर्षातून एकदाच घडणारा हा अद्भुत खगोलीय योगायोग पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून हजारो भाविक आणि पर्यटक खिद्रापूरात दाखल झाले आहेत.

बुधवारी रात्री ११:४२ वाजता स्वर्गमंडपातील वर्तुळाकार झरोक्यातून पौर्णिमेचा चंद्र अगदी मध्यभागी येतो आणि त्याचा तेजोमय प्रकाश खालील ‘चंद्रशीला’वर पडतो. त्या क्षणी मंदिरातील स्वर्गमंडप, शिल्पे आणि खांब चंद्रकिरणांनी उजळून निघतात. हे दृश्य इतके मंत्रमुग्ध करणारे असते की, ते पाहणारे प्रत्येक भक्त काही क्षणांसाठी भान हरपून बसतात.
या प्रसंगी मंदिर परिसरात दीपोत्सव, त्रिपुरा प्रज्वलन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या, भजन-कीर्तन, आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरण तयार होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, महाबळेश्वर तसेच कर्नाटक आणि गोवा येथून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

यावेळी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची उत्कृष्ट तयारी केली आहे. सीमावर्ती खिद्रापूर (Khidrapur)गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असून सांगली आणि कर्नाटकच्या कागवाड–चिकोडी सीमेवर वसलेले आहे.प्राचीन शिल्पकलेचा हा अद्भुत नमुना आज पुन्हा एकदा चंद्रप्रकाशात झळकणार आहे, आणि या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
महायुती तुटणार? “… त्यांचे उपकार विसरू नका”; NCP चा आमदार थोरवेंना इशारा
अभिनेत्रीला पाठवायचा प्रायवेट पार्टचे व्हिडीओ, अश्लील मेसेज… एकदाच भेटायला बोलावलं अन्..
पेन्शनर्सना मोठा दिलासा! EPFO ने घेतला महत्त्वाचा निर्णय…