नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या(elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतराचा वेग वाढल्याने मित्रपक्षदेखील एकमेकांना धक्के देताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून अनेक नेते आपली राजकीय दिशा बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांत भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते आपल्या गळाला घातले. आता मात्र जवळच्या मित्रपक्षानेच शरद पवार यांना दगा दिल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर पक्षांतराचा ओघ वाढला असून महाविकास आघाडीतलीच काँग्रेस आता राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

धाराशिवमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन वेळा तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवलेले आणि स्थानिक स्तरावर मजबूत पकड असलेल्या जगदाळे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी(elections) झालेला हा प्रवेश महाविकास आघाडीतील समीकरणे बदलण्याची शक्यता वाढवतो.जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच नळदुर्ग नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागांवर लढणार असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट प्रत्येकी एका जागेवर स्पर्धा करणार आहेत. या फॉर्म्युल्यावर तीनही पक्षांची तात्पुरती सहमती झाल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी दोन-तीन दिवसांपूर्वी सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका दिला होता. राष्ट्रवादी गटातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांच्यासह संपूर्ण गट भाजपमध्ये दाखल झाला. यामध्ये माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा आणि शशिकांत कैंची यांचा समावेश आहे.या प्रवेशामुळे सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद कमी झाली आहे. भाजपने एकाच वेळी पाच माजी नगरसेवकांची फोड करून निवडणूकपूर्व मोठी रणनीती आखल्याचे स्पष्ट आहे. महायुतीकडून ही एक महत्त्वाची खेळी मानली जात असून शरद पवार गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे.

हेही वाचा :
काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून
इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध
‘बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल…’ ठाकरे आक्रमक