ठाणे आणि नवी मुंबईतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महायुतीत नवा (corruption) राजकीय वाद पेटला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत सत्ताधाऱ्यांच्या अरेरावीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना निवडणुकीत समोरासमोर लढण्याचे खुले आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या संघर्षात उडी घेत वातावरण आणखी तापवले आहे.

दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत (corruption) यांनी गणेश नाईक यांना थेट शिवसेनेत परतण्याचे आवाहन केले. “माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे. भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा वरच्या पातळीवरून मिळतो. त्यामुळे त्यांनी स्वगृही परतावे आणि शिवसेनेत येऊन ही लढाई उघडपणे लढावी,” असे राऊत म्हणाले. नाईक यांनी भ्रष्टाचार आणि सत्तेतील अरेरावीविरुद्ध रणशिंग फुंकले असल्याचे सांगत, ही लढाई सत्तेत राहून शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला.
राऊत यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील भूखंड (corruption) व्यवहारांवरही गंभीर आरोप केले. रस्ते व बगीचांसाठी राखीव असलेले भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गणेश नाईक यांनीच पूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यांची आठवण करून देत, “भ्रष्टाचार सुरू राहिला तर तुरुंगाची वेळ येऊ शकते,” असे सूचक विधान केले. मात्र, अशा आरोपांनंतरही सरकारकडून पाठबळ मिळत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करत निवडणुकीत थेट सामना करण्याचे आव्हान दिल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि नवी मुंबईतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.