बिहार निवडणुकीत (elections)भाजपच्या वाट्याला आलेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणावर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. एकिकडे सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास कमाल वाढला असतानाच दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कामगिरीकडे विरोधत अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. त्यातच सर्वाधिक लक्ष वेधत आहे ते म्हणजे ठाकरे कुटुंब. राज्याच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोघांचेही पक्ष एकत्र येकाना दिसत असून आता फक्त अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा आहे. मात्र याचदरम्यान मनसेच्या गटात मात्र चिंता वाढली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे अमित ठाकरे यांच्या संकटांमध्ये पडलेली भर.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मनसेचं युवा नेतृत्त्नं असणाऱ्या या तरुण नेत्यावर गुन्हा दाखल झाला. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचं उद्घाटन करताना जमावबंदीचं उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रमाचं आयोजन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नेरूळ पोलिसांनी ही कारवाई केली.
‘महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही’, असं म्हणत त्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान झाला तर मनसे त्याला उत्तर देणार अशीच ठाम भूमिका त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडली.
‘महाराजांच्या सन्मानासाठी पुढाकार(elections) घेणं ही आपली जबाबदारी असून, ती आम्ही पार पाडली असं सांगताना, ही लढाई इथेच थांबणार नाही. आम्ही कोणाला घाबरणारे नाही आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही’, असंही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं. प्रत्यक्षात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करत त्याचं लोकार्पण करायला वेळ नाही, यासाठी नेता न मिळणं हे लाजिरवाणं असल्याचं सांगत ‘माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल’, अशा शब्दांत त्यांनी सदर प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान सदर प्रकरणी एनएमएमसीनं परिपत्रक काढत पुतळ्याचं अनावरण आस्थापनाकडून न झाल्याचं म्हणत पुतळ्याच्या आजुबाजूला असणारं निर्माण कार्य अद्यापही पूर्ण झालं नसून, ते अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. हेच कारण पुढे करत पुतळ्याची औपचारिक स्थापना आणि त्याची घोषणा अद्यापही प्रतिक्षेत होती, मात्र संबंधित व्यक्तींकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळ्याचं अनावरण करणं कायद्याचं उल्लंघन करणारं असून हे कृत्य अनधिकृत असल्याचं मत मांडलं. आता यावर मनसेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :
आजचा सोमवार ‘या’ राशींसाठी भाग्यशाली…
आयपीएल 2026पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने ‘या’ 9 खेळाडूंना केलं रिलीज!
महापालिका निवडणुका मार्चनंतर?