उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं(Shiv Sena) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षासंदर्भात मोठं विधान केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंचं फडणवीसांसोबत पटत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातही भाजपाने कशाप्रकारे आपली सूत्रं हलवली आहेत याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेनं फटकारे लगावलेत.

“शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जमत नाही. अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे. त्यात गणेश नाईक व रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या औकातीवर आणले. ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुनेजाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
“भाजपने आता स्वबळाचा नारा दिला व जेथे शिंदे यांचे आमदार निवडून आले, तेथे इतर पक्षांतील ताकदीची माणसे आपल्या पक्षात घेतली. म्हणजे पुढील विधानसभेला भाजप शिंदेंशिवाय निवडणुका लढणार हे नक्की. भाजपने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे,” असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
“भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. “शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे,” असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
“भारतीय जनता पक्षाचा मूळ स्वभाव ‘वापरा, फेका, नाहीतर गिळून फस्त करा,’ असाच आहे. शिंदे व त्यांच्या बरोबरचे 40 आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख(Shiv Sena) अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे,” असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

हेही वाचा :
Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स
… म्हणून मी ब्रेस्ट इंप्लांट केले, शर्लिन चोप्राने थट बॉलिवूडवर केले आरोप
कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन