एटीएममधून पैसे आले नाहीत पण खात्यातून कट झाले? नागपूरच्या एका ग्राहकाने हार न मानता ८ वर्षे लढा दिला. अखेर ग्राहक न्यायालयाने बँकेला दंड ठोठावत ग्राहकाला मोठा दिलासा दिला आहे,

आपण एटीएममध्ये पैसे काढायला गेलो. पैसे काढले, मोबाईलवर पैसे कापल्याचा मेसेजही आला, पण मशीनमधून रोख रक्कम बाहेर आली नाही तर तुम्हालाही धक्का बसेल ना. पण जेव्हा अशी परिस्थिती ओढवते तेव्हा सामान्यतः लोक बँकेच्या फेऱ्या मारून थकतात आणि शेवटी नशिबावर सोडून देतात. मात्र, नागपूरमधील एका ग्राहकाने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि कायदेशीर लढाईमुळे नामवंत अ‍ॅक्सिस बँकेला चांगलाच दणका बसला आहे. तब्बल आठ वर्षांच्या संघर्षानंतर ग्राहक न्यायालयाने बँकेला मूळ रकमेसह दुप्पट दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना ऑगस्ट २०१८ मधील आहे. नागपूर येथील तक्रारदाराला तातडीच्या कामासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन ५ हजार रुपये काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. सर्व स्टेप्स व्यवस्थित पार पडल्या. परंतु मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत. (ATM) त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या मोबाईलवर खात्यातून ५ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. पण त्याला पैसे मिळालेच नाहीत. तर दुसरीकडे खात्यातून पैसे वजा झाल्याने तक्रारदाराने तातडीने बँकेशी संपर्क साधला.

बँकेकडे रीतसर तक्रार करूनही व्यवस्थापनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. ग्राहकाने बँकिंग लोकपाल प्रणालीकडेही याप्रकरणी दाद मागितली. परंतु दुर्दैवाने तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. बँकेकडील सर्वच स्तरावर निराशा पदरी पडली. पण तरीही या ग्राहकाने हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे दरवाजे ठोठावले.

यानंतर नागपूर जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे आणि सदस्य मिलिंद केदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विशेष म्हणजे, याप्रकरणी जिल्हा ग्राहक आयोगाने नोटीस बजावूनही अ‍ॅक्सिस बँकेचा कोणताही प्रतिनिधी आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाला नाही.(ATM) त्यामुळे आयोगाने एकतर्फी सुनावणी घेत बँकेच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. यावेळी न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली.

याप्रकरणी बँकेने आपल्या ग्राहकाच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून घोर निष्काळजीपणा दाखवला आहे. तसेच या एटीएम व्यवहाराची चौकशी केल्याचा कोणताही ठोस पुरावा बँकेला सादर करता आला नाही. बँकेने त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची तसदीही घेतली नाही. जी त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. खात्यातून पैसे कापले जाऊनही रोकड न मिळणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे, अशा शब्दात आयोगाने बँकेवर ताशेरे ओढले. यानंतर आयोगाने याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.

तक्रारदाराच्या 8 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर आयोगाने ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने अ‍ॅक्सिस बँकेला तक्रारदाराचे अडकलेले ५,००० रुपये त्वरित परत करावेत, असे आदेश दिले आहेत. (ATM) त्यासोबत गेल्या ८ वर्षांत ग्राहकाला सोसाव्या लागलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासासाठी १०,००० रुपये अतिरिक्त भरपाई द्यावी, असेही म्हटले आहे. हा निकाल अशा सर्व ग्राहकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *