इचलकरंजी शहरातील कापड उद्योगाने आपल्या प्रगतीचा भव्य पट उलगडत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व महसूल साध्य केला आहे. शहरात सध्या ८१ हजार यंत्रमाग कार्यरत असून यात ६० हजार पॉवरलूम, ३ हजार ऑटोमॅटिक लूम, १५ हजार एअरजेट लूम आणि ३ हजार रॅपियर लूमचा समावेश आहे. या यंत्रमागांची एकूण दैनंदिन उत्पादन क्षमता ११७.७५ लाख मीटर असून वर्षाला सुमारे १९२७६ कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
यंत्रमाग सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या सायझिंग प्रक्रियेसाठी १९० मशिन्स कार्यरत आहेत. यात १३० साध्या सायझिंगच्या मशिन्स व ६० ऑटोमॅटिक व पीएलसी सायझिंग मशिन्सचा समावेश आहे ज्यामुळे दररोज ८ लाख किलो सायझिंगची क्षमता साधता येते.
प्रक्रिया उद्योगातही इचलकरंजीने भरीव कामगिरी केली आहे. येथे ५४ प्रक्रिया युनिट्स असून दररोज ३७.२० लाख मीटर कापड प्रक्रिया केली जाते. वर्षभरात सुमारे १११.६० लाख मीटर प्रक्रिया क्षमता साध्य होत असून यामुळे ११३१ कोटी रुपयांचा महसूल मिळतो.
यासोबतच दररोज सुमारे १७०० टन सूत लागते ज्यासाठी रोजचे ४७ कोटी रुपयांचे आणि वर्षभरात तब्बल १४२०० कोटी रुपयांचे सूत खरेदी होते.
इचलकरंजीचा हा वस्त्रोद्योग केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचा औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जात असून त्यातून लाखो लोकांना रोजगार आणि अर्थकारणाला चालना मिळत आहे.
