मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण(Reservation) द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगेंबरोबर हजारो मराठा आंदोलक पहाटेच्या सुमारास नवी मुंबईमधून मुंबई शहरात दाखल झाले. मनोज जरांगे प्रवास करत असलेली कार सकाळी साडेनऊच्या सुमारास आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झाली.

या आंदोलनाला एका दिवसाचा कालावधी आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीची अट घालून देण्यात आली असली तरी आंदोलकांची संख्या प्रचंड असल्याने त्यांना मूलभूत सुविधा अपुऱ्या पडल्याचं दिसून आलं. त्यामुळेच अनेक आंदोलकांनी रस्त्यांवरच अंघोळ केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
गुरुवारी दुपारी शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवनेरीवरील माती माथ्याला लावत प्रवासाला सुरुवात केलेल्या जरांगेचा ताफा मंचर, राजगुरुनगर, तळेगाव, लोणावळा मार्गे एक्स्प्रेस वेवरुन नवी मुंबईत दाखल झाला. साडेसहा हजार गाड्या असलेला हा ताफा पहाटे मुंबईत शिरला. प्रचंड जनसमुदाय आणि तितक्याच गाड्या यामुळे फ्री वेवरही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
अखेर नऊच्या सुमारास केवळ जरांगेच्या कारला आझाद मैदानाजवळ प्रवेश देण्यात आला आणि जरांगे आझाद मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टेजवर पोहोचले. तिथून त्यांनी भाषण करताना गुलाल माथ्यावर लागल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, असं सांगताना समर्थकांना पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
मनोज जरांगेंनी आंदोलकांना (Reservation)पोलिसांना सहकार्य करत गाड्या पार्किंगच्या ठिकाणी लावाव्यात असं सांगितलं. तसेच दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा आपल्यामुळे मुंबईकरांना त्रास नको असं सांगत परतण्याचा सल्ला दिला. तसेच मनोज जरांगेंनी शिस्त पालन करण्याचं आवाहन आंदोलकांना केलं. दुसरीकडे पुरेश्या सुविधा नसल्याने अनेक आंदोलकांच्या अंघोळीची आणि इतर सुविधांची गैरसोय झाली.
एका आंदोलकानेच तर मैदानामधील एका छोट्याश्या कृत्रिम डबक्यामध्ये अंघोळ केली. या गोलाकार रबरी डबक्याच्या सर्व बाजूंनी छोटीछोट्या फुल झाडांची सजावट करण्यात आलेली. यामध्ये उतरुन या आंदोलकाने थेट कंबरेभोवती टॉवेल गुंडाळून अंघोळ केल्याचं पाहायला मिळालं.
अनेक आंदोलकांनी मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ टँकरमधील पाण्याने रस्त्यावर अंघोळ उरकून घेतल्याचं दिसून आलं. आझाद नगर मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहतूक बंद करण्यात आल्याने आंदोलक या रिकाम्या रस्त्यांवर बसून होते. काही आंदोलकांनी या रस्त्यावर थेट झोप काढून घेतली. आरबीआय मुख्यालयाचा चौक, फॅशन स्ट्रॅटचा रस्ता येथे आंदोलक रस्त्यावर बसून होते. आंदोलकांचे हे व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मोठ्या संख्येनं आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित आहेत.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
पनीरच्या नावाखाली ‘चीझ अॅनालॉग’ची विक्री; ‘चीझ अॅनालॉग’ म्हणजे काय?
दुरुस्तीच्या नावाखाली घोटाळा; मोबाईलमधून प्रायव्हेट व्हिडीओ लिक