भारतामध्ये टेस्लाची एंट्री कधी होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेस्ला कार(car) खरेदी केली आहे. या खरेदीमुळे त्यांच्या परिवारातील नातवाचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.

सरनाईक कुटुंबाने टेस्लाच्या लोकप्रिय ‘मॉडेल वाय’ इलेक्ट्रिक कारची खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल ६० ते ७० लाख रुपयांच्या घरात असल्याचे समजते. ही गाडी पर्यावरणपूरक असल्याने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसाराला चालना देण्यासाठीही ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे.
या खरेदीबाबत सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले – “माझा मुलगा रेयांश हा फक्त तीन वर्षांचा आहे, पण त्याला गाड्यांविषयी जबरदस्त माहिती आहे. परदेशात असताना त्याने टेस्ला गाडीत बसल्यानंतर आजोबांना सांगितलं होतं की, मला टेस्ला पाहिजे. आज माझ्या वडिलांनी त्याचं स्वप्न पूर्ण केलं.”

पूर्वेश पुढे म्हणाले – “आजोबा आणि नातवाची ही गाडी असणार आहे. जिमला जाताना आजोबा आणि शाळेत जाताना नातू हीच गाडी घेऊन जाणार आहे. त्यामुळे घरात वेगळाच उत्साह आहे.”
टेस्ला ही जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार(car) उत्पादक कंपनी आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, अत्याधुनिक फीचर्स आणि प्रगत डिझाईनमुळे टेस्ला वाहनांना प्रचंड मागणी असते. भारतात या गाडीची एंट्री होणे हे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..
34 गाड्यांमध्ये बॉम्ब… बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी