कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार (politics)येऊन सात महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या सात महिन्यात महायुती मधील घटक पक्षांतील काही मंत्र्यांच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाले आहेत. राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हा वाद अजूनही संपुष्टात आणता आलेला नाही.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपणालाच मिळाले पाहिजे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी गेल्या काही महिन्यांपासून देव पाण्यात घातले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदावर आपलाच दावा असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात रायगड जिल्ह्याचे ध्वजवंदन आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले होते.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा(politics) नैतिक हक्क असल्याचे सांगून हे पद आपणालाच मिळाले पाहिजे असा प्रति दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि गोगावले यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगलेला होता. या दोघांनी परस्परांची स्टाईल नक्कल केली होती. त्यातच गोगावले हे पालकमंत्री पदासाठी मंत्र तंत्र करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते. कारण ते श्रीनगरच्या दौऱ्यावर होते.
मात्र त्यांच्या गटाचे गोगावले यांनी सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली होती. ते सुद्धा नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले आहेत असे मुंबईत सांगितले जात होते.

रायगड जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याला मिळावे यासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यात चढाओढ आहे. दोघांनीही या पदावर दावा सांगितला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात भाजपचे गिरीश महाजन यांना ध्वजवंदन करण्याची संधी देण्यात आली होती.

आता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपणास ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली पाहिजे असे दादा भुसे यांचे म्हणणे होते किंवा असले तरी गिरीश महाजन यांनाच ती संधी दिली जाणार आहे. नाशिक मधीलच आणखी एक वजनदार मंत्री छगन्य भुजबळ यांनी मात्र आपणाला पालकमंत्री पदामध्ये स्वारस्य नाही असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरून सर्व सामान्य जनतेला मात्र पालकमंत्री पदाला इतके महत्त्व का आहे असा प्रश्न पडलेला आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही कार्यक्रमाचे ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्याचा मान पालक मंत्र्याला असतो. त्यामुळे हा मान मिळवण्यासाठी मंत्र्यांनी
आटापिटा चालवला आहे असे सर्वसामान्य जनतेला वाटत असले तरी, जिल्ह्यातील विकास कामांवर होत असलेल्या खर्चातील टक्केवारीचा संबंध पालकमंत्री पदाला जोडला जातो आहे आणि ते अगदीच चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही.

याशिवाय पालकमंत्र्यांचा(politics) त्या जिल्ह्यातील सर्व खात्यांवर अंकुश असतो. सर्व खात्यामध्ये पालकमंत्र्याला हस्तक्षेप करता येतो. हे सुद्धा त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. राज्य पातळीवर मंत्री म्हणून संबंधितांना एकच खाते असते मात्र पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व खाती आपल्या हाती ठेवता येतात. त्यातून आपला मतदारसंघ बांधता येतो, अधिक सुरक्षित करता येतो, विश्वासू कार्यकर्त्यांना काम मिळवून देता येते. याशिवाय विश्वासू वर्तुळातील कार्यकर्त्यांची शासन दरबारी असलेली प्रलंबित कामे करवून घेता येतात. त्यातून कार्यकर्ता आपल्यापासून दूर जात नाही. आणि म्हणूनच जे मंत्री आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे असते.

फार वर्षांपूर्वी राजकारणाची पार्श्वभूमी असलेला रामदास फुटाणे यांचा”सामना”हा मराठी चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात मास्तराची भूमिका करणारे श्रीराम लागू यांच्यावर चित्रित करण्यात आलेले एक सुरेख गाणे आहे. “कुणीतरी अशी पटापट उत्तर आम्हा देतील काय? या टोपी खाली दडलय काय? या मुकुटाखाली दडलय काय? असा या गाण्याचा मुखडा असून तो सध्याच्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तंतोतंत लागू होतो.

हेही वाचा :

अंधश्रद्धेचा कहर: चोरीच्या संशयितांना दिला मंतरलेला विडा”

“फक्त 4 दिवसांत ST ची 137 कोटींची कमाई, यशामागचं रहस्य उलगडलं”

स्वातंत्र्य दिन व संवत्सरी निमित्त महापालिकेचा निर्णय १५ व २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *