गॅस सिलेंडर(cylinder) हा एक प्रकारचा जिवंत बॉम्ब आहे अशा शब्दांत अनेकदा सूचित केलं जातं. सतर्कतेचा इशारा दिला जातो. तो नेमका का? जर चुकूनही या सिलेंडरचा स्फोट झाला तर नेमकं काय होईल, याचं दाहक वास्तव दाखवणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना नुकतीच घडल्याचं पाहायला मिळालं. जिथं राष्ट्रीय महामार्गावर शेकडो सिलेंडरचा एकामागून एक स्फोट झाला आणि युद्धादरम्यान तोफगोळ्यांच्या स्फोटानं होतो इतका भयंकर आवाज अन् आगीचे लोट घटनास्थळी पाहायला मिळाले. सोशल मीडियावर अनेकांनीच या भीषण प्रसंगाचे व्हिडीओ शेअर केल्यानंतर तेथील विचलित करणारी दृश्य हादरवून गेली.

जयपूरमध्ये ही भीषण दुर्घटना घडली असून जयपूर अजमेर राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ एक तब्बल 200 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. गॅस सिलेंडर(cylinder) नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातामुळे हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की 10 किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, सिलेंडर स्फोटानंतर लागेल्या आगीत इतर पाच वाहनंही आगीच्या विळख्यात सापडली.
जयपूर अजमेर राष्ट्राय महामार्गावर असणाऱ्या दूदू नामक ठिकाणाजवळील मौजमाबाद इथं हा अपघात घडला. ज्यामध्ये एलपीजी सिलेंडर असणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या महादेव ढाबा इथं उभा होता. तेव्हाच प्रचंड वेगानं येणाऱ्या टँकरनं या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातानं निर्माण झालेल्या उर्जेतून ठिणग्या उडताच ट्रक आणि टँकरला आग लागली. धडक दिलेल्या टँकरमध्ये रसायन असल्यानं त्यानंही पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला.
मंगळवारी रात्री उशिरा साधारण 10 वाजून 15 मिनिटांनी हा अपघात झाला. या घटनेची तीव्रता इतकी होती,की मदतीसाठी कोणी पुढेही सरसावू शकलं नाही. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत होते आणि हे सिलेंडर हवेत भिरकावले जात होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाची वाहनं आली आणि जवळपास अडीच तासांच्या अथक परिश्रम, प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेला ट्रक अक्षरश: मेणासारखा वितळला होता, ही दृश्य पाहणाताना अनेकांनाच धक्का बसला.
सिलेंडर ट्रकचा चालक ढाब्यावर जेवण्यास बसला असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये रसायनांनी भरलेल्या टँकर वाहनात दोन व्यक्ती होत्या. त्यातील एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. दुसरी व्यक्ती मात्र केबिनमध्ये अडकल्यानं घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढावला. या दुर्घटनेत चारजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

घटनेनंतर बचावकार्यातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी टँकरचं केबिन पाहण्यात आलं तेव्हा तिथं फक्त एक मानवी सापळा दिसला. अर्थात तिथं असणाऱ्या व्यक्तीचा जिवंतपणीच होरपळून मृत्यू ओढावला हे मन सुन्न करणारं वास्तव समोर आलं. ज्यानंतर हे अवशेष एका पिशवीतून रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार इथं साधारण 70 हून अधिक मोठे स्फोट झाले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
हेही वाचा :
कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य….
सरन्यायाधीशांचा अवमान…! ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा!
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची तब्बल 4 तास चौकशी; अटक होण्याचीही शक्यता