पट्टणकोडोली (तालुका हातकणंगले) येथे आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं “चांगभलं” च्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या गजरात आणि खोबरे, खारीक, लोकर, भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला मंगल प्रारंभ झाला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादला.दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी फरांडे बाबा यांनी पारंपरिक हेडाम नृत्य करत यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर विठ्ठल बिरदेव मंदिरात विधिवत भाकणूक(Prediction) (देववाणी) झाली.

कार्यक्रमानंतर गावातील मानकरी, धनगर समाज पंच आणि ग्रामस्थ मंडळींनी पारंपरिक रितीनं मानाच्या दुधारी तलवारींचे पूजन केलं. या मिरवणुकीत प्रकाश पाटील, रणजित पाटील, अभय मगदूम, आवटे, गावडे, कुलकर्णी, चौगुले यांसह अनेक मानकरी सहभागी झाले.फरांडेबाबांनी गादीवरून उठून मंदिरात दर्शन घेतल्यानंतर देववाणी दिली. लाखो भाविकांनी भंडारा, लोकर, खारिक, खोबरे यांच्या उधळणीत भक्तीचा उत्सव साजरा केला. यात्रेतील धार्मिक विधी आणखी दोन दिवस चालणार आहेत.
दरम्यान, यात्रेतील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यात्रेला भेट देऊन सीसीटीव्ही नियंत्रण कक्षांची पाहणी केली(Prediction). डीवायएसपी विक्रांत गायकवाड आणि पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांना कडक बंदोबस्ताचे आदेश दिले.

फरांडेबाबांची भाकणूक (देववाणी)
पर्जन्य: सात दिवसांत पाऊस पडेल
बळीराजा: रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा देशभर होईल
धारण: दोन, सव्वा दोन, अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल
महागाई: मिरची, रसभांडे कडक होतील
भूमाता: भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल
आशीर्वाद: “नवल्या मी होईन, हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन”
राजकारण: राजकारणात गोंधळ, उलथापालथ होईल — भगव्याचे राज्य येईल
रोगराई: देवाची सेवा करणाऱ्याची रोगराई दूर होईल
कांबळा: “माझ्या गुरूचे चरण जो धरेल त्याला मी सदैव आशीर्वाद देईन”
ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि परंपरेचं प्रतीक मानली जाते. दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने या यात्रेला उपस्थित राहून विठ्ठल-बिरदेवाचे आशीर्वाद घेतात.
हेही वाचा :
“मोहतरमा, क्या है आपके खूबसुरती का राज?”
या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा
आजचा सोमवार राशींसाठी भाग्यशाली! दिवसाची सुरुवात होणार शुभकारक,