माढ्यात महायुतीला धक्का, शरद पवार विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरी दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झालं आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता माढ्यातून शरद पवारांच्या पक्षाच्यावतीनं धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्यानं रंगतदार लढत होणार आहे.शरद पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार नारायण पाटील (Naryan Patil) देखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यामुळं महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार , सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी पोहोचले आहेत . आज दुपारी चार वाजता जयंत पाटील हेदेखील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचणार असून येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबीय व इतर हजारो कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत. शरद पवार , विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्रित आल्यानं याचा परिणाम माढा, सोलापूर या लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर दिसणार आहे.
शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी प्रवीणदादा गायकवाड , शेकाप चे भाई जयंत पाटील , बाबासाहेब देशमुख , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे उपस्थित आहेत.विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्हील चेअरवर बसून शरद पवारांचं स्वागत केलं. करमाळा येथील महायुतीचे माजी आमदार नारायण पाटील मोहिते पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं महायुतीला धक्का बसला आहे. शिंदे शिवसेनेचे नेते मोहिते यांच्या घरी पोहोचल्याने हा महायुतीला धक्का मानला जात आहे. 2019 किरकोळ मतांनी पराभव झाला होता. सध्या करमाळ्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे महायुतीसोबत आहेत. महायुतीत ही जागा संजयमामा शिंदे यांच्याकडे जाऊ शकते. त्यामुळं नारायण पाटील आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेऊ शकतात, अशी माहिती आहे.
दुसरीकडे माढा येथील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे हे देखील दाखल झाले आहेत. याशिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे. येथील शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख आणि करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत