हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धनगरवाडी येथील २६ वर्षीय गोरख पातळे यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव पंचायत समिती (shocking incident) अंतर्गत रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शेतकऱ्यांच्या नावावर कागदोपत्री विहिरी खोदल्याचे दाखवून निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच संबंधितांना निलंबितही करण्यात आले होते. या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी गोरख पातळे यांना चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी त्यांच्यावर मारहाण आणि दमदाटी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे. अखेर या तणावातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला असून दोषी पोलिस अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जात आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय