विक्रमी पातळी गाठल्यानंतर मौल्यवान धातूंच्या किमतीत सुरू झालेली घसरण या आठवड्याच्या सुरुवातीलाही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोने आणि चांदीचे भाव उतरणीला लागले आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष आता या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय बँकांच्या बैठकांवर लागले आहे.गेल्या आठवड्यात मोठी पडझड अनुभवल्यानंतर, सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही सोने(Gold) आणि चांदीच्या दरात घट झाली. मुंबई सराफा बाजारात जीएसटी वगळून २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२४,४८० रुपयांवर आला, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१५,१४० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला.

वायदे बाजारातही सोन्याला(Gold) फटका बसला असून, देशांतर्गत एमसीएक्सवर सोन्याचा डिसेंबर वायदा ०.७७ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,२२,५०० रुपयांवर आला. दिवाळीपूर्वी १.३५ लाखांच्या घरात पोहोचलेले सोने आता लक्षणीयरीत्या खाली आले आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मागील दोन महिन्यांतील विक्रमी तेजीनंतर आलेली ही घसरण केवळ तात्पुरती आहे की, बाजारात नवीन टप्पा सुरू झाला आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
सध्याच्या घसरणीमागे अमेरिकन डॉलरची दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचलेली किंमत हे प्रमुख कारण मानले जात आहे. तसेच, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळला आहे. कॅपिटल डॉट कॉमचे विश्लेषक काइल रोडा यांच्या मते, व्यापार करारामुळे सोन्याचे आकर्षण तात्पुरते कमी झाले असले तरी, जागतिक स्तरावर कमी व्याजदर आणि आर्थिक धोरणांच्या अपेक्षांमुळे सोन्यातील तेजी कायम राहू शकते.
काही विश्लेषक या घसरणीला नफावसुलीनंतरची नैसर्गिक सुधारणा मानत आहेत. त्यांच्या मते, जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कायम राहील. मात्र, या घसरणीचे भवितव्य बऱ्याच अंशी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीतील निर्णयांवर अवलंबून असेल. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भविष्यातील व्याजदर कपातीच्या संकेतांवर गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असेल. धोरणात कोणताही बदल न झाल्यास सोन्यावर दबाव वाढू शकतो, तर व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास पुन्हा तेजी येऊ शकते.

अॅस्पेक्ट बुलियनचे सीईओ दर्शन देसाई यांच्या मते, अल्पकालीन चढ-उतार हे जागतिक घडामोडींवर अवलंबून असतील, तर मेहता इक्विटीजचे राहुल कलंत्री यांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार, सोन्याला $४०५०-४००५ प्रति औंसवर आधार असून, $४१४५-४१६५ वर अडथळा आहे. भारतीय बाजारात सोन्याला १.२२ लाख ते १.२१ लाख रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान आधार मिळू शकतो.
हेही वाचा :
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…कार्तिकी एकादशीनिमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; ५ वर्षात मिळवा ५ लाखांचे व्याज..
टीम इंडियाला मोठा धक्का…