महाराष्ट्रातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ११५० जादा एसटी बसेस पंढरपूरकडे सोडण्याची घोषणा केली आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होणार असून, लाखो वारकऱ्यांच्या(Warkari) सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या जादा बस फेऱ्या ‘चंद्रभागा’ यात्रा बसस्थानकावरून चालवल्या जाणार आहेत. या बसस्थानकात १६ फलाट, सुमारे १००० बसेसच्या पार्किंगची सोय आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी गर्दी नियंत्रणासाठी १२० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहतील. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता यावी म्हणून फिरती बिघाड दुरुस्ती पथके देखील कार्यरत राहतील.
भाविकांच्या सोयीसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले आहेत. गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे. तसेच, राज्यातील कोणत्याही गावातून ४० पेक्षा अधिक प्रवाशांनी मागणी केल्यास, त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

एसटी महामंडळाच्या सवलतीच्या योजनाही कायम राहणार आहेत. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा (अमृत ज्येष्ठ नागरिक योजना) दिली जाईल. महिलांसाठीही ५० टक्के तिकीट सवलत (महिला सन्मान योजना) लागू असेल.मागील वर्षीच्या (Warkari)कार्तिकी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने १०५५ जादा बसेसद्वारे ३.७२ लाख भाविकांची वाहतूक करून ६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. यंदाही वारकऱ्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; ५ वर्षात मिळवा ५ लाखांचे व्याज..
टीम इंडियाला मोठा धक्का…
लैंगिक छळाचे आरोप होऊन देखील ‘या’ गायकाने थाटला दुसरा संसार; थेट 16 वर्षांनी लहान…