भारतीय स्वयंपाकघरात लोणच्याचं(pickle) एक खास स्थान आहे. जेवणात थोडं आंबट, खारट आणि तिखट काहीतरी हवं असं वाटलं की लोणचं लगेच आठवतं. प्रत्येक प्रदेशाचं स्वतःचं वेगळं लोणचं प्रसिद्ध आहे, कोणी आंब्याचं लोणचं तर कोणी लिंबाचं, पण थंडीत खास लोकप्रिय असतं ते मुळ्याचं लोणचं. मुळा हा हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारा भाजीपाला असून, त्याचे लोणचं केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायीही असतं. मुळ्यात फायबर, व्हिटॅमिन सी, आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे पचन सुधारतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

ग्रामीण भागात आजही मुळ्याचं लोणचं मातीच्या बरणीत साठवून ठेवतात. त्याचा सुगंध जेवणात एक वेगळी चव आणतो. भाकरी, पोळी किंवा पराठ्यासोबत हे लोणचं(pickle) अप्रतिम लागते. खास म्हणजे हे लोणचं बनवायला अगदी सोपं आहे आणि काही दिवस टिकतंही. चला तर मग जाणून घेऊया घरगुती मुळ्याचं लोणचं बनवण्याची पारंपरिक पद्धत. नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
मुळा – 250 ग्रॅम (सोलून लांब तुकडे केलेले)
मीठ – 1 मोठा चमचा
हळद – 1 लहान चमचा
लाल तिखट – 2 मोठे चमचे
मोहरीचं तेल – 4 मोठे चमचे
मोहरी दाणे (काळी) – 1 मोठा चमचा
मेथी दाणे – 1 लहान चमचा
लिंबाचा रस – 1 मोठा चमचा
हिंग – चिमूटभर
कृती
यासाठी सर्वप्रथम मुळा स्वच्छ धुऊन सोलून घ्या. लांब काप करून मीठ आणि हळद टाकून मिसळा. त्यावर झाकण ठेवा आणि 3-4 तास बाजूला ठेवा म्हणजे त्यातील पाणी सुटेल.मुळ्याचं सुटलेलं पाणी हाताने दाबून काढून टाका. त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं.कढईत थोडं मोहरीचं तेल गरम करून त्यात मोहरी दाणे आणि मेथी दाणे टाका. ते तडतडले की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.

आता मोठ्या भांड्यात मुळ्याचे तुकडे, लाल तिखट, हिंग, वाटलेला मसाला आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा.शेवटी गरम केलेलं (थोडं थंड झालेलं) मोहरीचं तेल घालून सर्व मिश्रण एकत्र करा.तयार लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरा. दोन दिवस खोलीच्या तापमानात ठेवा म्हणजे सगळ्या चवी एकत्र येतील.मुळ्याचं लोणचं भाकरी, पराठा, पोळी किंवा डाळ भातासोबत अप्रतिम लागतं. हे लोणचं १५-२० दिवस सहज टिकतं.मुळा चांगला कोरडा केला नाही तर लोणचं पटकन बिघडू शकतं. मोहरीचं तेल वापरल्याने टिकाऊपणा आणि चव वाढते.हवामान थंड असेल तर हे लोणचं आणखी जास्त दिवस टिकतं.
हेही वाचा :
गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
मोदी सरकारचा ‘बँकिंग’ क्षेत्रातील मोठा प्लॅन…