राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या(elections) तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष आपापल्या परीने ज्या त्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत. तसंच उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका करताना यानिमित्ताने घराबाहेर पडले असा टोला लगावला आहे. तसंच राज ठाकरेंना फक्त निवडणूक पुढे ढकलणं इतकंच उत्तर हवं असल्याची टीका केली आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या(elections) तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या परीने संबंधित स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिघे एकच आहोत. कुठे युती झाली नाही तर निवडणुकीनंतर युती होईल. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “चांगलं आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले, मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. मी यापूर्वी सांगितले आहे विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा”.राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “त्यांना एकच उत्तर हवं आहे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपेक्षित नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही”.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत – 21 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल – 10 डिसेंबर
आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे.

विभागनिहाय नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुका
कोकण – 27
नाशिक – 49
पुणे – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती – 45
नागपूर – 55
हेही वाचा :
Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली
ऐश्वर्या रायचा मोठा गौप्यस्फोट! अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर केला खुलासा
मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल