कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडती मंगळवारी ज्या त्या महानगरात काढण्यात आल्या. या संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची(elections) पूर्व प्राथमिक प्रक्रिया म्हणून या आरक्षण सोडतीकडे पाहिले जाते. आता या निवडणुका जानेवारी 2026 च्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नगर परिषदा, नगरपंचायत, नगरपालिका यांच्या निवडणुकीचा धुरळा राज्यभर उडाला आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी थोड्याफार फरकाने आपल्या राजकीय वैचारिक बैठका बदललेल्या दिसतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राजकारण्यांचा”‘ सावळो गोंधळ'” पाहायला मिळतो आहे. जानेवारी महिन्याच्या दरम्यान शालेय परीक्षां असल्यामुळे निवडणुकीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

पण यानिवडणुका पुढे जाणे न्यायाचे होणार नाही आणि शिवाय सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 ही डेडलाईन दिलेली आहे. निवडणुकांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही असे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सदस्य मतदार याद्या हे कारण पुढे करून या निवडणुका किमान सहा महिने ते वर्षभर पुढे ढकला अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना केली आहे. पण याच संदर्भातील काही याचीका मुंबई उच्च न्यायालयाने याच दरम्यान फेटाळल्या आहेत. राज्य सरकारनेही या निवडणुका(elections) पुढे गेल्या पाहिजेत असे म्हटलेले नाही.निवडणुका घेण्याची तयारी आणि सिद्धता राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता फारच कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी तसेच नेत्यांनी आपली भूमिका लवचिक ठेवली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये विस्तुही आडवा जात नाही. एकमेकांच्या विरुद्ध बोलताना नेत्यांनी टोकाची भाषा वापरलेली आहे.

पण या निवडणुकांच्या निमित्ताने काहीशी उदारमतवादी भूमिका घेतली गेलेली दिसते. कोकणात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असे राजकीय वातावरण आहे. पण कणकवली सारख्या नगरपालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र लढणार आहेत. आणि त्याला नारायण राणे यांचा विरोध आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर एकनाथ शिंदे गेले तर त्यांच्याशी आम्ही संबंध तोडू असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. तर महायुती मधील शिंदे सेनेचे वजनदार मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे यांच्याबरोबरच्या युतीला मान्यता दिली आहे. म्हणजे या निवडणुकीत दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याचे चित्र दिसते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.

म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर असणार नाही. तर महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसणार आहे. शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा वारंवार आरोप करणारे राज ठाकरे हे त्यांच्याबरोबर दिसणार आहेत. शरद पवार यांनी तर त्यांच्या गटाला स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा सल्ला दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड मध्ये भाजपच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्याबद्दल तेथील अपक्ष आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे विश्वासू शिवाजीराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कागल मध्ये असेच विचित्र चित्र दिसणार आहे. उद्धव ठाकरे यांनीही स्थानिक नेत्यांना कोणाबरोबर आघाडी करायची याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही कुठे स्वबळ तर कुठे महायुती अशी लवचिक भूमिका घेतलेली आहे. विधानसभेत भाजप हा सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक सदस्य बळ असलेला पक्ष बनला पाहिजे असे धोरण भाजपच्या पक्ष सृष्टीचे आहे.

आम्हीच मोठे भाऊ आहोत अशी भाजपाचे महायुतीमध्ये धारणा आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतसर्वाधिक जागावर भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे. महायुतीवर मत चोरी करून सत्तेवर आलेले सरकार अशी टीका करायची आणि याच महायुतीमधील घटक पक्षांबरोबर कुठे ना कुठेतरी जमवून घ्यायचे असे महाविकास आघाडीचे धोरण दिसते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे राजकीय चित्र दिसते आहे. त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असलेल्या महापालिकांच्या निवडणुकीतही अशीच लवचिक भूमिका राजकीय पक्षांची असेल. सामान्य लोकांच्या भाषेत या भूमिकेला”सावळो गोंधळ” म्हणतात.

हेही वाचा :

इचलकरंजी मधील यड्राव येथे लग्न करीत नसल्याने आईवर विळतीने हल्ला

PL 2026 च्या आधी Mumbai Indiansची मोठी चाल…

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो! जाणून घ्या कारणे आणि उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *