मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अखेर मोठी (drop)आणि निर्णायक माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती उद्या, मंगळवार 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. या युतीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात येणार असून, यासोबतच मुंबई महापालिकेसाठीचं जागावाटपही अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे.नवीन वर्षाच्या तोंडावर होणाऱ्या या राजकीय घडामोडीमुळे आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील इतर महापालिका निवडणुकांसाठी राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे ब्रँड’ प्रभावीपणे उभा राहणार असल्याचं चित्र आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी (drop)ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात सविस्तर चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.संजय राऊत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की, शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही युती मनापासून स्वीकारली आहे. कोणत्याही स्तरावर संभ्रम नाही आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. युतीबाबत मनोमिलन झालं असून जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

वरळी येथील डोममध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, त्या क्षणापासूनच युती जवळपास निश्चित झाली होती, (drop) असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर झालेल्या बैठकींमध्ये जागावाटपावर कोणताही विसंवाद झाला नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे उद्या होणारी पत्रकार परिषद ही केवळ औपचारिक घोषणा असून, प्रत्यक्षात युती आधीच कार्यान्वित झाल्याचं चित्र आहे.या युतीमुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे.भाजप आणि इतर पक्षांसाठी ही युती मोठं आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांचं लक्ष उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागून राहिलं आहे. या घोषणेत मुंबई मनपातील जागावाटपाचे आकडे, संयुक्त रणनीती आणि आगामी निवडणुकांचा रोडमॅप समोर येण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येताच राज्याच्या राजकारणात नवं पर्व सुरू झाल्याचं मानलं जात आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक